औरंगाबाद : औरंगाबाद विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलीस, आरोग्य कर्मचारी काम करत असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये 29 कोरोनाबाधित आहेत. शहरात आतापर्यंत 1300 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर 1000 जणांचं स्क्रिनिंग करण्यात आलं आहे. तसंच 1300 बेडची व्यवस्थाही करण्यात आली असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तबलिगी जमातचे 102 लोक आले असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ट्रॅव्हल व्हिजा वापरुन त्याचा गैरवापर करणाऱ्या 156 लोकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. त्याशिवाय शहरात सारीचे 228 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.


रमझानच्या अनुषंगाने कोणतेही सण सार्वजनिकरित्या साजरे न करण्याचा सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत. अनेक मौलवींनी तसा फतवाही काढला आहे. शहरात संचारबंदी लागू आहे. मात्र, गरज पडल्यास कडक अंमलबजावणीही करण्यात येईल. कोणी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.


शेती माल विक्रीला कुठलीही अडचण नाही. मात्र राज्यातील क्षमतेपेक्षा जास्त कैदी असलेल्या सहा कारागृहांमध्ये लॉकडाऊन आहे. कारागृह पोलीस जेलमध्येच राहणार असून नव्याने कोणीही आत जाणार नाही किंवा बाहेर येणार नसल्याचं, अनिल देशमुख यांनी सांगितलं.


महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या केल्या गेल्या आहेत. चाचण्या अधिक झाल्या की बाधित लोकांचा आकडा वाढतो. त्यामुळे महाराष्ट्रात आकडा वाढल्याचं दिसून येत असल्याचंही ते म्हणाले.