वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी देणारे गुप्ता सक्तीच्या रजेवर
वाधवान कुटुंबियांच्या २३ जणांवर गुन्हा दाखल
मुंबई : कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात गुरूवारी २४ तासांत २५ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळल्याची माहिती समोर आली. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचे नियम आणखी कडक केले जात असताना वाधवान कुटुंबियांतील २३ जणांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्याकरता व्हीआयपी पास मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वाधवान कुटुंबियांना शिफारशीचे प्रवासाचे पत्र देण्याऱ्या अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
येस बँक, DHFL घोटाळ्यातील आरोपी वाधवान ब्रदर्स यांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्यासाठी विशेष प्रधानसचिव अमिताभ गुप्ता यांचे शिफारशीचे पत्र दिले जाते. या पत्रावर एक-दोघे नाहीत तर तब्बल २३ लोकांनी प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले असून अमिताभ गुप्तांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. (DHFL घोटाळा : वाधवान कुटुंबीय पाचगणीत क्वारंटाइन)
एकाबाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामान्य जनतेला घराबाहेर पडू नका, प्रवास टाळा असं सांगत असतानाच सरकारी यंत्रणा मात्र अशावेळेस कशी गप्प बसते? हा प्रश्न आता सामन्यांना पडला आहे. उद्धव ठाकरे या प्रकरणाने नाराज झाल्याचं देखील समोर आलं आहे. (येस बँक घोटाळा : लॉकडाऊनमध्येही आरोपी वाधवान ब्रदर्स व्हीव्हीआयपी पासने महाबळेश्वरला)
एकाचवेळी प्रवास केलेल्या या सगळ्या व्यक्तींची चौकशी होणार असून आता त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. एवढंच नव्हे तर या सगळ्यांना पाचगणीच्या सेंट झेविअर्स शाळेत क्वारंटाइन करण्यात आलं आहे.