मुंबई: महाराष्ट्रात यापुढे हुक्का पार्लर चालणार नसल्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  राज्यात हुक्का पार्लरवर बंदी घालण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला राष्ट्रपतींकडूनही मंजुरी देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००३ मध्ये लागू केलेल्या सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनं अधिनियमानुसार या निर्णयाचं उल्लंघन केल्यास संबंधीत दोषींना एक लाख रुपयांचा दंड आणि तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 


हुक्का पार्लरवर पूर्णपणे बंदी घालणारं महाराष्ट्र हे देशातील दुसरं राज्य ठरलं आहे. यापूर्वी गुजरातमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला होता. 


मुंबईतील कमला मिल येथे असणाऱ्या एका पबमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर हुक्का पार्लवर बंदी आणण्याचा विषय ऐरणीवर आला होता. ज्यानंतर हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 


कोणी मांडला होता हुक्का पार्लर बंदीचा प्रस्ताव? 


२०१७ च्या डिसेंबर महिन्यात झालेल्या नागपूर अधिवेशनात भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधीमंडळात हुक्का पार्लर बंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडला होता. याचवर्षी एप्रिल महिन्यात हे विधेयक विधीमंडळात पारित झालं. आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्र राज्य सरकारने याबाबत अधिसूचना जारी केल्याचं पाहायला मिळत आहे.