रुग्णाला ११ हजार कमी पडले, बदल्यात रुग्णालयाने रुग्णाच्या बायकोचे मंगळसूत्र घेतले
खरंतर रुग्णाला जेव्हा रुग्णालयातून घरी सोडण्याची वेळ आली तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांना सगळे रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी सांगितले.
बुलढाणा : या लाजीरवाणी घटनेबाबत ची माहिती स्थानिकांना समजताच, स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांना 11 हजार रुपये कमी पडले, तेव्हा रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्र ठेऊन घेतले. कोरोना काळात बऱ्याच खासगी रुग्णालयांनी आणि रुग्णवाहिकेने रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची लूट केल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. त्यात आता ही बुलढाण्याची आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
खरंतर रुग्णाला जेव्हा रुग्णालयातून घरी सोडण्याची वेळ आली तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांना सगळे रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी सांगितले. रुग्णाच्या पत्नीने रुग्णालयाची रक्काम भरली परंतु तिला 11 हजार रुपये कमी पडले. त्यामुळे उरलेल्या 11 हजार रुपयांची व्यवस्था होईपर्यंत रुग्णाला सोडण्यात येणार नाही, असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. शेवटी, रुग्णाच्या बायकोने आपले मंगळसूत्र काढून ते रुग्णालय प्रशासनाला दिले.
रुग्णाच्या वडिलांकडून संताप व्यक्त
रूग्णाच्या म्हाताऱ्या वडिलांनी गरीब कुटुंबाची असहाय अवस्था आणि रुग्णालय प्रशासनाचे निकृष्ट दर्जाचे उदाहरण लोकां समोर आणले आहे.रुग्णाच्या वडिलांनी घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले, त्यांच्या सूनेने आधीच त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी आपले कानातले गहाण ठेवले आहेत.
ज्याची किंमत 28 हजार रुपये आहे, परंतु परिस्थितीचा गैरफायदा घेत खरेदीदाराने केवळ 23 हजार रुपये दिले. परंतु तरीही आम्ही रुग्णालयातील बिल संपूर्ण भरु शकलो नाही. जेव्हा रुग्णालय प्रशासनाने पैसे मोजले तेव्हा त्यांनी 11 हजार रुपये कमी पडत असल्याचे सांगितले.
रुग्णाच्या वडिलांनी पुढे सांगितले आहे की, रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, त्यांचे पैसे दिले नाही तर ते माझ्या मुलाला सोडणार नाहीत. यानंतर त्यांनी माझ्या सुनेच्या गळ्यातील मंगळसूत्र देण्यास सांगितले. शेवटी आमच्याकडे दुसरा पर्याय न उरल्याने माझ्या सुनेला मंगळसूत्र त्यांना काढून द्यावे लागले.