मुंबईः मुंबईतील मरीन लाइन्स परिसरात असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहातील १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने देशभरात संतापाचे वातावरण आहे. इतकंच नव्हे तर, या घटनेत संशयित असलेल्या हॉस्टेलच्या सुरक्षारक्षकाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. त्यामुळं या प्रकरणाचा गुंता अधिक वाढला आहे. या प्रकरणात मृत मुलीच्या वडिलांनी हॉस्टेलच्या वॉर्डनवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. तर, आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकाश आंबेडकर यांनी आज पीडित मृत मुलीच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. 'अकोल्यावरून मुलगी शिकायला येते होस्टेलला राहते. तिथेच तो आरोपी अनधिकृतपणे राहतो, असं बोललं जातंय. रेल्वे पोलिसांनी एका माणसाचा मृतदेह सापडला. पंचनामा झाला तेव्हा त्या बॉडीसोबत चावी मिळाली आहे. ही चावी त्या रुमची होती. ती त्याच्याकडे कशी आली, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसंच, मी पोलिसांना सांगितलं आहे की त्याचा डीएनए तपासून घ्या, हाच माणूस आहे का तपासून घ्या,' असंही त्यांनी म्हटलं आहे. 


'मुलीचा शेवटचा पेपर होता. त्यानंतर ती तिच्या घरी जाणार होती. पण त्यापूर्वीच असं घडलं. गळा आवळून तिचा खून करण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. तिच्या कुटुंबीयांनी म्हटल्यानुसार, हॉस्टेलच्या वॉर्डनने मुद्दामून त्या मुलीला आणि आणखी दोन मुलींना वेगळं ठेवलं होतं. त्यांची चौकशी करण्यात यावी. त्या मुलींना बाजूला का ठेवलं याची चौकशी करा,' असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. 


'घटना घडली त्या दिवशी दरवाजा लावला होता की नाही हे पाहा, आरोपी चौथ्या मजल्यावर कसा पोहोचला. तो पायऱ्यांवरुन चढून गेला असेल तर त्याचे पायऱ्यावर फिंगरप्रिंट असतील ते पाहा. पायऱ्यावर फिंगरप्रिंट मिळाले नाही तर तो तिथपर्यंत गेलाच कसा, याचा शोध घ्या, अशीही शंका आंबेडकरांनी उपस्थित केली आहे. तसंच, वसतिगृह समाज कल्याण खात्याच्या अख्त्यारित येते. मात्र, दुर्दैव आही की समाज कल्याण खात्याचा एकाही अधिकाऱ्याने भेट दिली नाही. त्यांनी भेट दिली पाहीजे होती. हा समाज कल्याण खात्याचा हलगर्जीपणा दिसत आहे,' असा आरोपही त्यांनी केला आहे.  


न्याय मिळाला पाहिजेः पीडितेचे वडील 


'तिला एकटीला त्या मजल्यावर का ठेवले? ज्या सुरक्षा रक्षकला ठेवले त्याच्यावर आयकार्ड नाही त्याला का कामावर ठेवले?, असे उद्विग्न सवाल पीडितेच्या वडिलांनी केले आहेत. माझी मुलगी नेहमी मला फोन करायची आणि विचारपूस करायची. तिचा फोन नेहमीप्रमाणे नाही आला म्हणून मी हॉस्टेल वर कॉल केला. त्यांनी मल सांगितले कि मुलीच्या रूम वर लॉक आहे. तुम्ही मुंबई मध्ये या. आम्ही मुंबई मध्ये आल्यावर आम्हाला ते जे.जेमध्ये घेऊन गेल्यावर कळले कि तिच्या देहावर कपडे नव्हते. तिच्या गळ्यावर निशाण होते,' असं म्हणत मृत मुलीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.


दरम्यान, पीडित मुलीचा मृतदेह स्वीकारण्याचा निर्णय पीडितेच्या आई-वडिलांनी घेतला आहे. आज संध्याकाळी सहानंतर दादर चैत्यभूमी स्मशानभूमी येथे पीडितेवर अंतिम संस्कार केले जाणार आहे.