`या` तारखेपासून राज्यात हॉटेल्स, लॉज पुन्हा सुरु होणार
असा असेल पुन:श्च हरिओमचा पुढचा टप्पा....
मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता सावधगिरीचा इशारा म्हणून गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यात हॉटेल्स, लॉज, विश्रामगृह बंद ठेवण्यात आले होते. पण, अनलॉक अर्थात राज्यात 'मिशन बिगीन'च्या नव्या टप्प्याअंतर्गत राज्यात पुन्हा एकदा हॉटेल आणि लॉज सुरु होणार आहेत.
राज्य शासनानं याबाबत अधिकृत पत्रक जारी करत सविस्तर माहिती आणि नियमावली दिली. ज्यामध्ये ८ जुलैपासून हॉटेल आणि लॉज सशर्त सुरु करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. कंटेन्मेंट झोन अर्थात प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेर हॉटेलं ३० टक्के मनुष्यबळाच्या अटीवर सुरु करण्यात येणार आहेत. जेथे कोरोनाची लक्षणं नसणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
निवासी सुविधा देणाऱ्या हॉटेलांसाठीची नियमावली
- कोरोना, कोविड 19 विषयीची माहिती देणारे फलक, पत्रकं, स्टँडी दर्शनीय स्थळी लावावेत.
- वाहनतळापासून हॉटेलच्या इतर क्षेत्रांमध्ये गर्दीच्या व्यवस्थापनासाठी योग्य ती व्यवस्था असावी. रांग लावण्यासाठी योग्य ती आखणी करणं बंधनकारक. सोबतच बैठक व्यवस्था करतेवेळी त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाणं आवश्यक.
- प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था असावी. स्वागतकक्ष अर्थात रिसेप्शन टेबलपाशी संरक्षणात्मक काच शील्डचा वापर करण्यात यावा.
- 'पॅडल ऑपरेटेड' म्हणजेच पायाचा वापर करुन हातावर घेता येणारे हँड सॅनिटायझर्स मोफत उपलब्ध करुन देण्यात यावेत. स्वागत कक्ष, गेस्ट रुम, लॉबी, सभागृह या ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात यावी.
- मास्क, ग्लोव्ज, फेस कव्हर अशा वस्तू हॉटेलचे कर्मचाऱी आणि ग्राहकांना उपलब्ध करुन द्यावं.
- क्यूआर कोड, ऑनलाईन फॉर्म्स, डिजिटल पेमेंट, इ वॉलेट, अशा सुविधांचा वापर करावा. जेणेकरुन एकमेकांशी होणारा संपर्क सहजपणे टाळता येईल.
- लिफ्टचा वापर करतेवेळी मनुष्यसंख्या नियंत्रणात ठेवत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं.
- वातानुकूलित यंत्र म्हणजेच एसीचा वापर करतेवेळी CPWD ने घालून दिलेल्या निर्देशांचं पालन केलं जाणं आवश्यक. ज्यामध्ये एसीचं तापमान २४ ते ३० अंशांपर्यंत ठेवण्यात यावं. आर्द्रता ही ४०- ७० टक्के असावी. ताजी आणि खेळती हवा जास्तीत जास्त वापरात आणण्याचा सल्ला.
हॉटेलमध्ये येणाऱ्यांबाबतचे निकष खालीलप्रमाणे
- कोरोनाची लक्षणं नसलेल्यांनाच हॉटेलमध्ये प्रवेश.
- मास्क, फेस कव्हर, फेस शील्ड वापरणाऱ्यांनाच हॉटेलमध्ये प्रवेश. इतकंच नव्हे, तर हॉटेलमध्येही मास्कचा वापर करणं अपेक्षित.
- हॉटेलला भेट देणाऱ्या (ग्राहक) व्यक्तीनं प्रवासाचा इतिहास, वैद्यकिय माहिती, ओळखपत्र आणि इतर माहिती स्वागत कक्षापाशी जमा करावी.
- ग्राहकांनी आरोग्य सेतू ऍपचा वापर करणं अनिवार्य.
- हाऊसकिपिंग सुविधांचा कमीत कमी वापर करण्यावर भर द्यावा.
रेस्टॉरंटसाठीची नियमावली
- बैठक व्यवस्थेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन अत्यावश्यक.
- ई मेन्यू, विघटनशील कागदी नॅपकिनचा वापर वाढवावा.
- डाईन इन ऐवजी रुम सर्व्हिस किंवा टेक अवेला प्राधान्य द्यावं.
- रेस्टॉरंटची सेवा ही 'रेसिडेंट गेस्ट' अर्थात निवासी ग्राहकांसाठीच उपलब्ध असेल.
हॉटेलमधील गेमिंग झोन, स्विमिंग पूल, जीम बंदच ठेवण्यात येणार आहे. तर, स्नेहसंमेलन सोहळ्यांवर बंदी असेल. सभागृहांसाठीची खोली फक्त १५ व्यक्तींसाठीच खुली करण्यात येईल.
अत्यावश्यक नियम आणि अटींसह राज्यातील हॉटेल्स सुरु होणार आहेत. असं असलं तरीही सातत्यानं निर्जंतुकीकरण करणं, स्वच्छतागृह ठराविक वेळानं स्वच्छ करत राहणं, वापरलेल्या सर्व साहित्याची योग्य ती विल्हेवाट लावणं अशा सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. या अटी आणि नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असणार आहे.