NCP Crisis: शरद पवारांनी जन्माला घातलेली राष्ट्रवादी 7 महिन्यात अजित पवारांची कशी झाली? काय-काय घडलं?
NCP Crisis in Maharashtra: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे.
NCP Crisis Latest News: महाराष्ट्रात सर्वाच मोठी राजकीय घडामोड घडली आहे. 25 वर्ष शरद पवारांच्या ताब्यात असलेला राष्ट्रवादी पक्ष फक्त 7 महिन्यात चिन्हासहित अजित पवारांना मिळाला आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाचंच असल्याचा निर्णय दिला आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हासाठी शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. सुनावणीत दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर निवडणूक आयोगानं अजित पवार गटाच्या बाजूने निर्णय दिला आहे.
अशी झाली अजित पवारांच्या बंडाची सुरुवात
2023 मध्ये अजित पवारांनी बंडाला अप्रत्यक्षपणे सुरुवात केली होती. विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली होती. विरोधी पक्षनेतेपदाएवजी संघटनात्मक जबाबदारी देण्याची मागणी अजित पवार यांनी यानी शरद पवार यांच्याकडे केली होती. साधारण जून 2023 मध्ये या सर्व घडामोडी घडत होत्या. अजित पवार यांनी 1 जुलै पर्यंतचा अल्टीमेटम देखील दिला होता. मात्र, अजित पवार यांच्या मागणीची राष्ट्रवादी पक्षाकडून दखल घेण्यात आली नाही. अखेरीस अजित पवार यांनी थेट बंडाचे हत्यार उपसले आणि शरद पवारांना मोठा धक्का दिला.
2 जुलै 2024... महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप
2 जुलै 2024... या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजभवनावर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदार अजित पवारांसह राजभवनात दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी शपथ घेतली. एकाच टर्ममध्ये अजित पवार तिस-यांदा उपमुख्यमंत्री बनलेत. अजित पवारांसोबतच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे यांनीही शपथ घेतली.
अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा
शिंदे फडणवीस यांच्यासह सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. यानंतर अजित पवार गटाने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करत राष्ट्रवादी पक्ष आमचाच असल्याचा दावा केला. यानंतर शरद पवार गटाकडून देखील याचिका दाखल करण्यात आली. सुप्रिम कोर्टाने राष्ट्रवादी कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवला. अवघ्या सात महिन्यात राष्ट्रवादी कुणाची याचा निकाल लागला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निर्णय दिला आहे.