विसर्जनाला बाहेर पडताय, ही काळजी घ्या
मोबाइल आणि पाकीट चोऱ्या करणाऱ्या तरुणांची टोळी मिरवणुकीत सामील झालेली असते.
मुंबई : बारा दिवस घर, मंडळात राहिलेल्या लाडक्या बाप्पाला आज भाविक भक्तीभावाने निरोप देत आहेत. बाप्पाच्या विसर्जनाला लाखो भाविक घरातून बाहेर पडले आहेत. पण याचसोबत काही समाजकंटकही या गर्दीचा फायदा घेण्यासाठी फिरत आहेत.
पोलीस, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर सर्वांवर आहेच तरीही भाविकांनी स्वत: ची काळजी घेणे गरजेचे आहे. गणेश उत्सव व विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्याचा गैरफायदा चोरटे घेत असल्याचे दिसून आले आहे.
मोबाइल आणि पाकीट चोऱ्या करणाऱ्या तरुणांची टोळी मिरवणुकीत सामील झालेली असते. मिरवणुकीत ते वेगवेगळ्या भागात गटाने फिरतात. गर्दीच्या ठिकाणी थांबतात. एखाद्याला हेरून त्याचे लक्ष वेधून घेतात तोपर्यंत दुसऱ्याने आपले काम केलेले असते. काही कळायच्या आतच आपला मोबाईल, दागिने, पाकिट लंपास झालेले असते. यामध्ये महिलाही सक्रिय आहेत.
गेल्यावर्षीही गणेश विसर्जन मिरवणुकीत जास्त महागडे मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी आल्या होत्या. अनेक जणांच्या मौल्यवान वस्तूवर गर्दीत चोरट्यांनी डल्ला मारला होता.
ही घ्या काळजी
नागरिकांनी विसर्जन मिरवणुकीत आपल्या मौल्यवान वस्तू आणि मोबाइल सांभाळावेत.
संशयास्पद वस्तू आढळल्यास तातडीने त्याची माहिती पोलिसांना द्यावी.
तुटलेले वीजेचे खांब, अस्वच्छता, कोणतीही गैरसोय आढळल्यास पोलीस ,पालिका कर्मचाऱ्यांची मदत घ्या.