राज्यात कोरोना बळींच्या आकडेवारीत प्रचंड घोळ! हजारो मृत्यू कुणी आणि का लपवले?
राज्यात मृत्यूंच्या आकडेवारीत लपवाछपवी झालीय?
योगेश खरे, झी 24 तास, नाशिक : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी अजूनही काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. दुसऱ्या लाटेत अनेक जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. यापैकीच एक जिल्हा म्हणजे नाशिक. बाधित आणि बळींमध्ये देशभरातल्या आकडेवारीत नाशिक पाचव्या क्रमांकाचा जिल्हा आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात 10 जून पासून आतापर्यंत विक्रमी 3223 मृत्यूची संख्या नोंदवण्यात आली. याचं कारण म्हणजे मृत्यूसंख्येत दाखवण्यात झालेला घोळ...
हे फक्त नाशिकपुरतं नव्हे तर संपूर्ण राज्यात मृत्यूंच्या आकडेवारीत लपवाछपवी झालीय. राज्यात २८ मे ते 16 जूनपर्यंत मृत्युसंख्या 6521 असल्याची नोंद होती. ताळमेळ झाल्यानंतर तब्बल 16,644 मृत्यू वाढविण्यात आलेत. 10 ते 15 जून या काळात हजारांच्या वर मृत्यूसंख्या दाखवण्यात आली तर ताळमेळ झाल्यावर दररोज तीनशे ते चारशे मृत्यू वाढवण्यात आले. 27 जूनपर्यंत 8520 दैनंदिन मृत्यू नोंदवण्यात आले. पण ताळमेळ लावल्यानंतर महिनाभरातल्या मृत्यूंची संख्या तब्बल 29 हजार 61 एवढी झाली. या काळात दैनंदिन झालेले आठ हजारांच्या आसपासचे मृत्यू वेगळेच. आतापर्यंत वीस हजार 539 मृत्यू अपडेट करण्यात आलेत. पण ही आकडेवारी 25 हजारांच्या वर आहे.
आरोग्य विभाग दर पंधरा दिवसांनी मृत्यू संख्येचा ताळमेळ घालतो, हा दावा किती खोटा आहे, हे या घोळामुळे चव्हाट्यावर आलंय. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
- आकडेवारीसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमलेली असताना एवढा घोळ का?
- तांत्रिक सबब सांगून एवढा अक्षम्य घोळ कसा घातला जातो?
- ही लपवाछपवी राजकीय संगनमतानं झाली का ?
- जे दोषी आहेत, त्यांच्यावर कधी आणि काय कारवाई करणार ?
देशात सर्वात जास्त कोरोनाचं थैमान महाराष्ट्रात असताना बळींच्या आकड्यांची लपवाछपवी करून कोरोनाला आळा घालण्याऐवजी तो आणखीन वाढण्याचाच धोका अधिक आहे. त्यामुळे कोरोनाच्या आकडेवारीत पारदर्शकता महत्त्वाची आहे.