कपिल राऊत, झी 24 तास, ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून ठाणे जिल्ह्धिकाऱ्यांनी पर्यटन स्थळ, पिकनिक पॉईंट, धबधबे आणि किनारपट्टीच्या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातली आहे, असं असतानाही काही नागरिक नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत. मुंब्रा बायपासवरच्या धबधब्यावर पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यातील मुंब्रा इथं मुंब्रा देवी डोंगरावर अतिशय नयनरम्य अशा धबधब्याकडे पर्यटक नेहमीच आकर्षित होत असतात. इतकंच नाही तर पावसाळ्यात दररोज विशेष करून सुट्टीच्या दिवशी आणि रविवारी या धबधब्यावर पर्यटक प्रचंड गर्दी होत असते. पण सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे राज्यात कलम 144 म्हणजेच जमावबंदीचा आदेश लागू आहे. शिवाय ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ठाण्यातील सर्वच धबधबे, नद्या, तलाव आणि पर्यटन स्थळे या सर्वच ठिकाणी नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. असं असताना देखील मुंब्रा बायपास वरील मुंब्रा देवी डोंगरातील धबधब्यावर सकाळपासूनच नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे.  



धक्कादायक म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जात नसून, एकाही नागरिकाने मास्क घातलेला नाही. यामुळे मुंब्र्यात जमावबंदीचे आदेश किंवा पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई आदेश लागू होत नाही का? असा देखील प्रश्न निर्माण होतोय.


एकीकडे डेल्टा प्लस या कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे अनेक ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. यात ठाणे जिल्ह्याचाही समावेश होतो. असं असूनही धबधब्यावर लोकांची गर्दी होवून देखील मुंब्रा पोलिसांनी याठिकाणी साधी भेटही दिली नाही. अशा बेफिकिरीने नागरिक वागत असतील तर कोरोनाला आळा घालणार कसा असा प्रश्न उपस्थित होतो.