Huge Traffic Jam: मुंबईला गुजरातशी जोडणाऱ्या प्रमुख मार्गांपैकी एक असलेल्या ठाण्यातील घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. घोडबंदर कडे जाणाऱ्या मार्गिकेवर करपे कंपाऊंड जुना टोल नाका येथे एक भलामोठा गर्डर घेऊन जात असलेला पूलर बंद पडला. रात्री पावणेतीनच्या सुमारास पूलर बंद पडल्याने दुसऱ्या पूलरच्या मदतीने त्याला बाजूला काढण्यासाठी साडेतीन तासांहून अधिक काळ लागला. मात्र हा ट्रक आणि माल वाहतुकीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याने या एका गर्डर पूलरमुळे घोडबंदरवर काही किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. 


दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा गर्डर पूलर बरोबर आडवा असतानाच बंद पडल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. जवळपास तीन तासांहून अधिक काळापासून इथं गाड्या अडकून असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. ज्या ठिकाणी हा पूलर बंद पडला तिथून दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. रात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास अन्य पूलरच्या मदतीने पोलिसांच्या उपस्थितीमध्ये हा बंद पडलेला पूलर बाजूला काढण्याचं काम सुरु केलं. हा पूलर बाजूला काढेपर्यंत सकाळचे साडेसहा वाजले. या एवढ्या प्रदीर्घ काळादरम्यान मार्गावरील दोन्ही लेनमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने इथे काही किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. 


व्यवस्थापनात गोंधळ, साधा यू-टर्नही घेता येईना


वाहतूक कोंडीमध्ये दोन्ही बाजूने येणाऱ्या गाड्यांची संख्या वाढत वाढत मारुतीच्या शेपटाप्रमाणे दोन्ही लेनमध्ये रात्रीपासूनच वाहनांची लांबलचक रांगच लागत गेली. परिस्थिती एवढी गंभीर आहे की वाहनांच्या रांगा अगदी बळकूम आणि माजीवाडा नाक्यापर्यंत पोहचल्या आहेत. या ठिकाणी योग्य व्यवस्थापन नसल्याने लहान-मोठ्या गाड्या ट्रकच्या गर्दीमध्येच अडकून असल्याची माहिती दोन तासांहून अधिक काळ या वाहतूक कोंडीत अडकलेल्या ठाण्याच्या प्राची गोडसे यांनी 'झी 24 तास'शी बोलातना दिली. तसेच या ठिकाणी अडकलेल्या छोट्या गाड्यांना यू-टर्न घेऊन ठाण्याकडे परतण्यासाठीचा मार्गही ट्रक्समुळे बंद आहे. अगदी काही मीटर अंतरावर यू-टर्न असतानाही अनेक गाड्यांना इंचभरही वाहतूक हलत नसल्याने एकाच जागेवर अनेक तास तिष्ठत उभं रहावं लागत आहे. 


हळूहळू दिलासा


सकाळी आठनंतरही या ठिकाणच्या परिस्थितीमध्ये सुधारणा नव्हती, पावणे नऊच्या सुमारास हळूहळू या ठिकाणी वाहनं हलण्यास सुरुवात झाली. काही आठवड्यांपूर्वीही या ठिकाणी घोडबंदर रोड घाटातील रस्त्याची डागडुजी करण्यासाठी काही दिवसांचा ब्लॉक घेण्यात आलेला तेव्हाही अशीच वाहतूक कोंडी होत होती. मात्र आता या ठिकाणी पावसामुळे आधीच रस्त्याची दुरावस्था असताना गर्डर पूलरच्या माध्यमातून नवीन अडथळा वाहतुकीत निर्माण झाला.