आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांची केंद्र सरकारकडून चौकशी केली जाणार आहे. त्यांच्यावर आपली मानसिक स्थिती योग्य नसल्याचं तसंच आपल्या अपंगत्वाबद्दल खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. तसंच वडिलांची संपत्ती 40 कोटींहून अधिक असताना पूजा यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसं मिळवलं असा प्रश्न विचारला जात आहे. आपल्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावण्यामुळे अडचणीत आलेल्या पूजा खेडकर यांनी सेवेत दाखल होण्यापूर्वीच अनेक मागण्या केल्या होत्या. प्रशिक्षणार्थी असतानाच पूजा खेडकर यांनी कार, स्वीय्य सहाय्यकाबरोबरच वेगळ्या केबिनसाठी मागणी केली होती. पूजा खेडकर यांच्यावर आधीच इतके आरोप असताना आता आणखी एक आरोप झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र गृह मंत्रालयाकडे रिपोर्ट सादर केला आहे. यामध्ये त्यांनी पूजा खेडकर यांनी चोरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या नातेवाईकाची सुटका करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. 


पूजा खेडकर यांनी 18 मे रोजी पोलीस उपायुक्तांना फोन करून चोरी करण्यात आलेल्या स्टीलची वाहतूक केल्याच्या संशयिताला सोडण्याची मागणी केली होती. काही अहवालांमध्ये त्याचं नाव ईश्वर उत्तरवाडे असल्याचं सांगण्यात आलं होतं. पूजा खेडकर यांनी तो निर्दोष असून, त्याच्यावरील आरोप किरकोळ असल्याचं सांगत सोडण्यासाठी आग्रह केला असा दावा आहे. 


पूजा खेडकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या फोन कॉलमध्ये स्वतःचं नाव सांगितलं होतं. पण अहवालात सांगण्यात आलं आहे की, फोन करणारी व्यक्ती पूजा खेडकरच होत्या की दुसऱ्या एखाद्याने त्यांचं नाव घेत फोन केला याची खात्री नाही. तो सरकारी अधिकारी होता का याबद्दलही माहिती नव्हती. तरीही पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या उत्तरवाडेला सोडले नाही.


पूजा खेडकर यांच्या आईचा धमकावतानाचा व्हिडीओ व्हायरल


व्हिडीओत पूजा खेडकर पिस्तुलाचा धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकावत असल्याचं दिसत आहे. "जागा माझ्या नावावर आहे. मूळ मालक मी आहे. सातबारा माझ्या नावावर आहे. मला आधी कोर्टाचा कागद आणून दाखवायचा," असं मनोरमा खेडकर हातात पिस्तूल घेऊन वाद घालताना म्हणत आहेत. "मी कोर्टात येणार, काय व्हायचं ते होऊ दे," असं मनोरमा म्हणताना दिसत आहेत.


व्हिडीओ शूट करणारा शेतकऱ्यांबरोबरची व्यक्ती, 'मॅडम आपलं कायदेशीर सुरु आहे. तुम्ही आम्हाला का त्रास देताय?' असं विचारतो. त्यावर मनोरमा, "तुम्ही मला कायद्याचं सांगू नका. कायद्याने मला सांगितलेलं नाही की तुम्ही करु नका म्हणून," असं उत्तर देताना दिसतात. त्यानंतर बराच वेळ हा वाद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.


पूजा खेडकर यांचा जास्त भाष्य करण्यास नकार


पूजा खेडकर यांना प्रसारमाध्यमांनी आईचा व्हिडीओ तसंच इतर आरोपांबद्दल विचारलं असता त्यांनी, माझ्याकडे प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा अधिकार नाही सांगत जास्त भाष्य कऱणं टाळलं. माझं जे काही म्हणणं असेल ते मी समितीकडे मांडणार आहे. मी या विषयावर बोलू शकत नाही असं पूजा खेडकर यांनी सांगितलं आहे.