इचलकरंजी - सांगली मार्गावर परप्रांतीय कामगारांचा रास्तारोको
इचलकरंजी - सांगली मार्गावर परप्रांतीय कामगारांनी रास्तारोको केला आहे.
कोल्हापूर : इचलकरंजी - सांगली मार्गावर परप्रांतीय कामगारांनी आपल्याला घरी जावे, या मागणीसाठी रास्तारोको केला आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असतानाही कामगार रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहेत. यड्रावच्या पार्वती औद्योगिक वसाहतीतील कामगारांनी रास्तारोकोचे आंदोलन केले आहे. घरी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याची मागणी या कामगारांनी केली आहे. गेले दोन महिने बसून असल्याने कामगार संतप्त झाले आहेत. हाताला काम नाही आणि खायला काही नाही, त्यामुळे आम्ही परत जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया येथील कामगारांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत असल्याने लोकांचा मनात भीती निर्माणझाली आहे. राज्य सरकारने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे आणि एसटीची सुविधा पुरविली आहे. त्याचप्रमाणे आम्हाला घरी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी, अशी रास्तारोको करणाऱ्या कामगारांनी मागणी केली आहे.
राज्यात अडकलेल्या परराज्यातील लोकांना एसटी मोफत बससेवा देणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शनिवारी जाहीर केले होते. त्याप्रमाणे काही ठिकाणचे लोक आपल्या घरी परत आहेत. त्यांना एसटीची सेवा सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेल्या इतर राज्यातील प्रवाशांना महाराष्ट्रातील त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि इतर राज्यात अडकलेले लोक जे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठीच मोफत एसटी प्रवास असेल, असे सांगण्यात आले.
त्यानंतर आज इचलकरंजी - सांगली जवळील यड्रावच्या पार्वती औद्योगिक वसाहतीतील कामगारांनी रास्तारोकोचे आंदोलन केले आहे. जवळपास एक हजारांच्या घरात हे कामगार रस्त्यावर उतलेले दिसून येत आहेत.