प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : विरारच्या आयसीआयसीआय बँक दरोडा (ICICI Bank) व हत्या प्रकरणात अटकेत असलेला बँकेचा माजी मॅनेजर अनिल दुबे हा पोलिसांच्या तावडीतून फरार झाला आहे.अनिल दुबे असं या आरोपीचे नाव आहे.वसई सत्र न्यायालयात (Vasai Sessions Court) त्याला हजर केले जात असताना पोलिसांना चकवा देऊन तो फरार झाला होता. या घटनेनंतर पोलीस आता आरोपीच्या मागावर आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरारच्या पुर्वेत असलेल्या आयसीआयसीआय बॅंकेत (ICICI Bank) 29 जूलै 2021 रोजी दरोड्याची घटना घडली होती. या दरोड्यात आरोपीने महिला व्यवस्थापिका योगिता चौधरी यांची हत्या केली होती तर श्वेता देवरूखकर या महिला कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. दरम्यान दरोडा आणि हत्या करून घटनास्थळावरून पळ काढत असताना त्याला स्थानिक नागरिकांनी पकडले होता.त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या हवाली केले होते. 


या घटनेत बॅंकेत माजी व्यवस्थापक असलेल्या अनिलकुमार राजीव दुबे याने हा दरोडा टाकला होता. कर्जबाजारी झाल्याने त्याने बँक लुटण्याची योजना आखली होती. दरोडा टाकताना तो अटकेत आला होता. या गुन्ह्यात तो सध्या ठाणे तुरुंगात होता. आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास अनिल दुबे याला ठाणे जेल येथून वसई सत्र न्यायालयात (Vasai Sessions Court) तारखेला हजर करण्यासाठी आणले होते.यावेळी पोलिसांना चकवा देऊन हा आरोपी पसार झाला होता. 


दरम्यान या संपूर्ण घटनेने पोलीस दलात एकच खळबळ माजली आहेत. तसेच या आरोपीचा शोध घेण्यासाठी वसई विरार पोलीसांची (Vasai - virar) विविध पथके तैनात करण्यात आली आहे. लवकरच आरोपी ताब्यात येईल असा विश्वास पोलिस व्यक्त करतायत.