युतीशिवाय लढल्यास लोकसभेला दानवेंचा दीड-दोन लाखांनी पराभव होईल- संजय काकडे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन.
पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती न केल्यास भाजपला मोठा फटका बसेल. ४८ पैकी ४० मतदारसंघ तर सोडाच पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना स्वत:च्या मतदारसंघातही जिंकता येणार नाही. त्यांचा दीड-दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केले. संजय काकडे यांनी शुक्रवारी 'झी २४ तास'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतील संभाव्य परिस्थितीवर भाष्य केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेना सोबत आली नाही तरी आम्ही ४० जागांवर विजयी होऊ, असा दावा केला होता. मात्र, संजय काकडेंनी दानवेंचा हा दावा साफ फेटाळून लावला. शिवसेना सोबत न आल्यास रावसाहेब दानवे यांना स्वत:चा मतदारसंघ राखता येणार नाही, असा दावा काकडेंनी केला. यावेळी काकडे यांनी पुण्यातील भाजप नेत्यांविषयी नाराजीही व्यक्त केली. भाजप तुमच्याबाबतीत 'गरज सरो, वैद्य मरो' वागत आहेत का, असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. तेव्हा माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उत्तम जमत असल्याचे सूचक वक्तव्यही काकडे यांनी केले.
पुण्यातील लोकसभेच्या जागेवर लढण्यासाठी संजय काकडे इच्छूक आहेत. गेल्या दोन वर्षांत आपण पक्षासाठी केलेल्या कामाच्या आधारावर आपल्याला पक्षाकडून निश्चितपणे उमेदवारी मिळेल, असा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि गिरीश बापट यांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काकडे यांना संधी देणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळाच्या मनात आहे.
दानवेंनी काय म्हटले होते?
'आम्हाला एकत्र निवडणुका लढवायच्या आहेत, मात्र अजून शिवसेनेशी बोलणी सुरू झालेली नाहीत 'असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केले. 'आम्ही सर्व मतदार संघांचा आढावा घेत आहे. मात्र, त्याचा फायदा मित्रपक्षाला होईल, तर त्यांच्या कामाचा फायदा आम्हाला होईल. मात्र, कोणी आले नाही तर स्वबळावर लढू असेही दानवेंनी स्पष्ट केले आहे. ४१ मतदार संघांचा आढावा घेतला. युती झाली नाही तर ४० जागा निवडून आणू.