पुणे : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्या दृष्टीने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुद्धची लढाई एकजुटीने लढल्यास आपण नक्की जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड इथल्या कोविड हॉस्पिटलचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. एकाच व्यासपीठावर दोघेही आल्याने, चांगलीच चर्चा होती. यावेळी, अजित पवारांनी कोरोनाचं संकट अजूनही गेलं नसल्याचं सांगत, सर्वसामान्यांना उपचार उपलब्ध व्हावेत या हेतूनं हे कोविड सेंटर उभारल्याचं त्यांनी सांगितलं. तर, वैदयकीय सुविधा वाढवणं आणि लस येत नाही तोपर्यंत मृत्युदर १ टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी प्रयत्न करावेत असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. 



अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने स्वतः खर्च करुन कोविड रुग्णालयाची उभारणी केल्याबाबत त्यांचे अभिनंदन करतो. पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. या नगरीत विविध जाती, धर्माचे नागरिक राहतात. लोकसंख्या जास्त असल्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांना कमी वेळेत, कमी खर्चात उपचार मिळाले पाहिजे, खाटांची कुठेही कमतरता पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांवर उपचारांती जादा देयके आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर प्रशासनाची करडी नजर आहे. याकरिता शहरासह ग्रामीण भागात पथके तयार करुन देयकाचे लेखा परीक्षण करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोना विरुद्धच्या लसीची भारतातील पहिली मानवी चाचणी सिरम इन्स्टिट्यूटच्यामदतीने भारती रुग्णालयात करण्यात आली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस निर्मिती करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरु आहे, ही निश्चितच आशादायी बाब आहे.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड पालिकेच्यावतीने ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे  कोविड-१९ रुग्णालय उभारल्याबद्दल समाधानी आहे. नागरिकांच्या मदतीने एकत्रित लढाई लढूनही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात नक्की यश येईल.