राज्यभर पावसाचे थैमान! पुढील 2 दिवस आणखी मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुढील 48 तास धोक्याचे असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुढील 48 तास धोक्याचे असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापुरात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.
मॉन्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान असल्याने राज्यात गेल्या सहा दिवसांपासून तुफान पाऊस पडत आहे. घाट माथ्यावर अतिजोरदार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
राज्यात सकाळपर्यंतच्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, कोकणासह विदर्भात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली.
पावसानं राज्यात कहर केल्यामुळे शाळांना अनेक जिल्ह्यांमध्ये सुट्टी देण्यात आली. पुणे जिल्ह्यातल्या शाळांना 3 दिवस सुटी देण्यात आलीय. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 17 तारखेपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. तर संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्हा, वसई विरार, नवी मुंबई, नांदेड आणि गडचिरोली जिल्ह्यातही शाळांना आज सुट्टी देण्यात आलीय.