मुंबई: अवकाळी पावसापासून थोडी उसंत मिळाली असं वाटत असताना पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात पडणारी थंडी गायब झाली असून हवामानात मोठे बदल होत आहेत. एकीकडे वाढणारी उष्णता आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान देखील होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान पुन्हा एकदा गुजरात, महाराष्ट्र, गोवा राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर दक्षिण भारतातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टही आहे. 


महाराष्ट्रात 29 नोव्हेंबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्य़ात आला आहे. तर 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी देखील पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


राज्यात 29, 30 नोव्हेंबरला कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची व जोरदार वाऱ्यांची शक्यता. काही ठिकाणी हलका पाऊस पडेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी मुंबई- ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये  30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी देखील पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.