Cyclone Biparjoy and El Nino News : बिपरजॉय चक्रीवादळ आणि 'अल निनो' संदर्भात बातमी. बिपरजॉय  या वादळामुळे कोकण किनारपट्टी भागात परिणाम दिसू लागलेत. ढगाळ वातावरण तसेच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय. तर उत्तर गोलार्धात अल निनो ही सक्रीय झाल्याचे अमेरिकन हवामान खात्याने म्हटले आहे. या धोका भारताला बसण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिपरजॉय चक्रीवादळाने रत्नागिरीतील गणपतीपुळे या ठिकाणी समुद्राला उधाण आले आहे. काही ठिकाणी समुद्राला सध्या उधाण नसले तरी वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे सध्या किनारपट्टी भागामध्ये खबरदारी देखील घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनानं त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातल्या किनारपट्टी भागामध्ये अलर्ट जारी केलाय 


केरळात मान्सून दाखल, उत्तर गोलार्धात 'अल निनो' सक्रीय


 केरळमध्ये मान्सून दाखल होत असतानाच तिकडे उत्तर गोलार्धात 'अल निनो' ही सक्रीय झाल्याचे अमेरिकन हवामान खात्याने म्हटले आहे. भारतात सप्टेंबरनंतर अल निनोचा प्रभाव आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारतात पावसावर त्याचा परिणाम कमी जाणवण्याची शक्यता असली तरी मात्र, तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलियात दुष्काळ पडण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या अल निनोचा प्रभाव इंडोनेशियाच्या दक्षिणेला असणाऱ्या समुद्रात असल्याची माहिती आहे. 


बिपरजॉय चक्रीवादळामुळे पावसाचा जोर कमी 


केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता राज्यात कधी दाखल होणार याची प्रतीक्षा आहे. हवामान खात्यानं 13 जून रोजी मान्सून कोकणात दाखल होईल असा अंदाज वर्तवलाय. मात्र अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळामुळे पावसाचा जोर कमी असणारेय. 1 जून रोजी मोसमी वारे केरळमार्गे भारतात दाखल होतात. यंदा 4 जूनपर्यंत पावसाचा अंदाज होता. मात्र त्यानंतरही चार दिवसांच्या विलंबानं पाऊस केरळमध्ये दाखल झाला. 


मोसमी पावसाने केरळचा 75 टक्के आणि तमिळनाडूचा 35 टक्के भाग व्यापलाय. वाऱ्याच्या वाटचालीस पोषक स्थिती असल्यामुळे पुढील 48 तासांत वारे कर्नाटकपर्यंत मजल मारतील. त्यानंतर गोव्यात 11 जून आणि १३ जूनपर्यंत कोकणात मोसमी पाऊस पडेल, असे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.


गणपतीपुळे येथे समुद्राला उधाण


 दरम्यान, रत्नागिरीमध्ये समुद्राला अचानक उधाण आले आहे. गणपतीपुळे परिसरात समुद्राचं पाणी थेट बाजारपेठ आणि मंदिरापर्यंत आत शिरले. गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत समुद्राचं पाणी आले. तर चौपाटीवरील दुकानांत पाणी शिरल्यानं पर्यंटकांचं साहित्य वाहून गेले आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्रातील प्रवाहांमध्ये बदल झालाय. त्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.