मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाबाबत विधानसभेचे भाजप मुख्य प्रतोद आमदार ॲड. आशिष शेलार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. राज्यात एसटीचा संप बेमुदत सुरू असून या संपकरी कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १०० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटीचे काही कर्मचारी उदरनिर्वाहासाठी वेठबिगारी म्हणून काम करतोय. ट्रक चालवतोय. एसटी बंद असल्यामुळे शेतकरी, कष्टकरी ग्रामीण भागातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत. आता परिक्षा सुरू होत असून विद्यार्थी परिक्षा केंद्रापर्यंत कसे पोहचणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असे आशिष शेलार यांनी सांगितले. 


न्यायालयात तारखांवर तारखा पडत आहेत. सरकार काही तोडगा काढत नाही. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना 'तुम्हाला कामावरुन कमी करू, दुसरीकडे कंत्राटी कर्मचारी भरु, अशी धमकी सरकार देत आहेत असा आरोप करत या विषयावर चर्चा घडवून आणावी अशी मागणी त्यांनी केली. 


अध्यक्षांनी हा स्थगन प्रस्ताव नाकारल्याने भाजपा आमदार आक्रमक होऊन त्यांनी वेलमध्ये धाव घेतली. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी  सरकारच्यावतीने उत्तर देताना हे अधिवेशन संपण्यापुर्वी सरकार याबाबत आपली भूमिका स्पष्‍ट करेल असे जाहीर केले.


तर, विधानपरीषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उचलून धरला. त्यावेळी उत्तर देताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, एसटी विलीनीकरणाबाबत संदर्भातील अहवाल  सरकारने स्वीकारला आहे. हा अहवाल राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडून तो मंजूर जाईल, असे सांगितले.