Mumbai Local Train News : मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना मध्य रेल्वे मार्गावर घडली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर लोकलमध्ये एका गरदुल्याने धुमाकूळ घातला.  भायखळा रेल्वे स्थानकात हा तरुण महिलांच्या डब्यात चढला. विशेष म्हणजे सायंकाळी गर्दीच्या वेळेस हा सर्व प्रकार घडला आहे. 


काय घडलं नेमकं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायंकाळी 7.15 मिनीटांनी सीएसएमटी स्थानकाचून बदलापूर लोकल सुटली. ही लोकल भायखळा स्टेशनवर पोहचल्यानंतर  अचानक महिला डब्यात एक तरुण शिरला. हा तरुण गेटवर उभा राहून सिगारेट ओढत होता. डब्यातील महिलांनी त्याला दादरला उतरायला सांगितले. परंतु दादर स्टेशन आलं तरी हा तरुण उतरला नाही. उलट या तरुणाने लोकल मध्ये चढणाऱ्या इतर महिलांना देखील अडथळा निर्माण केला. सदर तरुण हा अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे.


कुर्ला स्थानकात पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले


महिलांनी सांगून देखील हा तरुण महिला डब्यातून दुसऱ्या डब्यात गेला नाही. उलट या तरुणाच्या विचित्र वागण्यामुळे डब्यातील काही महिला घाबरल्या होत्या. यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झाल होते. काही महिलांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. अखेर रेल्वे पोलिसांनी कुर्ला रेल्वे स्थानकात या तरुणाला ताब्यात घेतले.


कल्याण रेल्वे स्थानकात छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेने दिला चोप


कल्याण रेल्वे स्थानकावर एक महिला ट्रेन पकडण्यासाठी चालत जात होती. यावेळी अचानक एका दारूच्या नशेत धुत असलेल्या माथेफिरूने तिची छेड काढली. महिलेने आधी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. मात्र त्या तरुणाने तिच्या सोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. महिलाने आरडाओरडा करत तरुणाला विरोध करण्यास सुरवात केल्यानंतर संतप्त झालेल्या झालेल्या महिलेने आणि इतर प्रवाशांनी छेड काढणाऱ्या तरुणाला स्टेशनवरच चोप देण्यास सुरुवात केली. लोकांची गर्दी पाहून स्टेशन परिसरात गस्त घालणाऱ्या रेल्वे पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत दारूच्या नशेत धुत असलेल्या तरुणाला ताब्यात घेतले.


धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग


धावत्या लोकलमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. परीक्षेला जाणा-या एका 20 वर्षीय युवतीवर हा लैंगिक अत्याचार झाला होता. या तरुणीने सकाळी 7.28 वाजता ही विद्यार्थिनी सीएसएमटी पनवेल या लोकलच्या सेकंड क्लास डब्यात चढली. ट्रेन सुरू होताच एक आरोपी या डब्यात चढला आणि त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार सुरू केला. विद्यार्थिनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. एका वृद्ध महिलेने बचावासाठी पुढे येत पोलिसांना फोन करण्याचा इशारा दिला. मात्र आरोपीने त्यालाही दाद दिली नाही. मशीद बंदर स्टेशन येतात विद्यार्थिनीने ट्रेनमधून खाली उतरत स्वतःची सुटका करून घेतली. जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने आरोपी करीम नवाजला 8 तासांत अटक केली होती.