आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थिनीला आपल्या जागी रोजंदारीवर ठेवल्याचा धक्कादाय प्रकार गडचिरोली येथे घडला आहे. शिक्षक या विद्यार्थीनीला महिन्याला 1500 रुपये देत होता. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडचिरोली  जिल्ह्यातील कोरची  मुख्यालयापासून 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चरवीदंड येथे हा प्रकार घडला आहे.  शिक्षक सुशील आडीकने या शिक्षकाने चक्क रोजंदारी विद्यार्थीनीला आपल्या जागी शिकविण्यासाठी ठेवल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चरवीदंड येथे वर्ग 1 ते 5 पर्यंत वर्ग असून यामध्ये एकूण 16 विद्यार्थी आहेत. परंतु शिक्षक हे शाळेत येतच नाही. तर, मग येथे विद्यार्थी शिकतील कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


आदिवासी बहुल असलेल्या चरवीदंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सुशील आडिकणे यांनी चरवीदंड येथील एका बारावीचे शिक्षण झालेल्या विद्यार्थिनींना 1500 रुपये महिन्याप्रमाणे शिकवायला ठेवले होते. शिक्षकांनी एका बोगस शिक्षकाची नियुक्ती या शाळेत केली असल्याचे दिसून आले यामुळे एकच खळबळ माजली आहे. हे शिक्षक हे आठवड्यातून एक किंवा दोन दिवस येतात अथवा येत सुद्धा नाहीत अशीही तक्रार आहे. या आधीच्या अशाच प्रकरणात दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते. होते.आता या ताज्या प्रकरणात काय कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


निवृत्त शिक्षकाला 300 रुपये देऊन आपल्या जागी शाळेत पाठवले


गणपतीसाठी शिक्षक सुट्टी घेऊन गावी गेले आणि शाळेत मात्र विद्यार्थी जुगाराचे पत्ते घेऊन बसले. ही धक्कादायक घटना घडलीय पालघरच्या जिल्हा परिषद शाळेत. विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तकांऐवजी जुगाराचे पत्ते होते. विद्यार्थी वर्गात शिक्षण घेण्याऐवजी जुगार खेळत बसले होते. तलासरी तालुक्यातील सुत्रकार डोंगर पाडा इथल्या शाळेतला हा प्रकार घडला आहे.धक्कादायक म्हणजे सुट्टीवर जायचं म्हणून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानं एका निवृत्त शिक्षकाला 300 रुपये दिले आणि वर्गावर जायला सांगितलं. मात्र तो बदली शिक्षकही शाळेत न आल्यानं विद्यार्थ्यांनी वर्गातच पत्ते खेळायला सुरुवात केली.