महाराष्ट्रात बिनखात्याचे मंत्रीमंडळ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह 41 मंत्री बिनखात्याचे
राज्य सरकारचं खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे.
Maharashtra Cabinet Expansion : खातेवाटपाशिवाय विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपण्याची दाट शक्यता आहे. फडणवीस सरकारनं 5 फेब्रुवारीला शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला. पण मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही तासांत होणारं खातेवाटप झालेलं नाही. नागपूरचं हिवाळी अधिवेशनही खातेवाटपाशिवायच झालं. राज्यातील सगळ्या खात्यांचा कारभार सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा इतर 39 मंत्र्यांसोबत विनाखात्याचे मंत्री आहेत.
देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत येऊन सोळा दिवस उलटल्यानंतरही अजून महायुती सरकारचं खातेवाटप झालेलं नाही. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच 41 मंत्री 16 दिवस बिनाखात्याचे मंत्री राहिलेत.
बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, नितेश राणे, गणेश नाईक, शिवेंद्रसिंहराजे भोसले, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, जयकुमार रावल, माधुरी मिसाळ, अतुल सावे, आकाश फुंडकर, आकाश उईके, जयकुमार गोरे, आणि संजय सावकारे, राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, दत्ता भरणे, नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे, शिवसेनेचे शंभुराज देसाई, दादा भुसे, संजय राठोड, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, योगेश कदम, प्रताप सरनाईक, आशिष जैसवाल आणि उदय सामंत यांना अजूनही खातं मिळालेलं नाही.
बिनखात्याचे आहेत याबद्दल कुणाला कसं काही वाटत का नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. सरकारमध्ये मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे पण खातेवाटप नसल्याचं त्याचे गंभीर परिणाम राज्यावर होत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. भरत गोगावले मात्र कोणत्याही क्षणी खातेवाटप होईल या आशेवर आहेत. खातेवाटप झालं नसलं तरी अधिवेशन आणि अधिवेशनातल्या कामकाजावर काहीही परिणाम झाला नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केलाय. सरकार अस्तित्वात आहे. मंत्री अस्तित्वात आहेत. पण कोणत्याही मंत्र्याकडं खातं नाही. अशी विचित्र अवस्था किती दिवस चालणार असा प्रश्न मंत्री आपापसात विचारतायत.