Shocking News : राहत्या घरात जमीन खचली, मोठा खड्डा पडला, 3 महिला त्यात पडल्या आणि...
Shocking News : महिला घरात नेहमी प्रमाणे काम करत होत्या. यावेळी अचानक जमीन खचली आणि 20 फूट खोल खड्डा पडला. महिला या खड्ड्यात पडून जखमी झाल्या आहेत.
सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : रस्त्या खचल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. पंढरपूरच्या एका गावात मात्र, अजबच घटना घडली आहे. राहत्या घरात जमीन खचली आणि अचानक मोठा खड्डा पडला. या खड्ड्यात पडून तीन महिला जखमी झाल्या आहेत. या जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे (Shocking News).
पंढरपूर शहरातील क्रांती चौक जवळील दिंडी मठाशेजारील एका घरात ही घटना घडली आहे. राहत्या घरात अचानक 20 फूट खड्डा पडला आहे. या खड्ड्यात पडल्याने तीन महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना घडली तेव्हा महिला घरात काम करत होत्या.
या जखमी महिलांवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कविता वाल्मीक शिंदे (वय 65 वर्षे ) ज्योती दत्तात्रय संगीतराव (वय 30 वर्षे ) आणि सुरेखा सुभाष माने (वय 35 वर्षे) अशी जखमी महिलांची नावे आहेत.
हा खड्डा घरातील पेव प्रकारातील खड्डा असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या खड्ड्याची खोली अंदाजे 20 फूट इतकी आहे. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी अशी पेव धान्य साठवणे अथवा इतर कारणासाठी पूर्वी करून ठेवली जायची. यातीलच हा प्रकार असावा. मात्र, खालील जमीन ओलसर झाल्याने कदाचित हा भाग खचला असू शकतो असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
ठाण्यात रस्ता खचून 15 ते 16 फूट मोठा खड्डा पडला
ठाण्यात रस्ता खचल्याचा प्रकार सोमवारी रात्री उशीरा उघडकीस आला होता. ठाण्यातील ठाणा कॉलेज परिसरातील खारटन रोड शितला माता मंदिर चौकातील रस्ता खचल्याचे उघडकीस आले होते. या रस्त्यालर तब्बल 15 ते 16 फूट मोठा खड्डा तयार झाला . या ठिकाणी ड्रेनेजचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक रस्ता खचला गेला आणि भलामोठा खड्डा पडल्याचे स्थांनिकांनी सांगितले. याच ठिकाणाहून सिडको बस स्टॉप वरून नवी मुंबईच्या दिशेने बसेस सुटतात. तर, रेल्वे अंडरपास वरून चेंदणी कोळीवाडा, कोपरी या पूर्वेतील भागांतील वाहतूक सुरू असते. मात्र, सध्या ही पूर्ण वाहतूक बंद करण्यात आली होती.