प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : अवकाळी पावासामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे (Maharashtra Farmer). त्यातच शेतमालाच्या दराची थट्टा करणारी बातमी समोर आली आहे.  कांद्यानंतर आता वांगेही मातीमोल दरानं विकण्याची वेळ शेतक-यावर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात (Shirol taluka of Kolhapur district) वांग्याला 27 पैसे किलोचा दर मिळाला आहे (brinjal fetched 27 paise per kg).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐकून धक्का बसला असेल मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतकऱ्याचा उत्पादन खर्च सोडा. मात्र वाहतूक खर्चही यातून निघालेला नाही. बाजारात ग्राहक 20 ते 30 रुपये किलो दरानं वांगी खरेदी करत आहेत. मात्र शेतक-याच्या हातात केवळ 27 पैसे पडत आहेत. आजपर्यंतचा हा सर्वात नीचांकी दर आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला हा दर मिळाला. शेतकऱ्याला फक्त वांगी तोडणी आणि वहातुक खर्चासाठी अडीच हजार रुपये इतका खर्च आला. पण, याच वांग्याला अवघे एक किलोसाठी 27 पैसे इतका दर मिळाला आहे. विक्रमसिंह जगदाळे असे वांगी उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे.


10 पोती कांदे विकल्यावर मिळाला दोन रुपयांचा चेक 


काही दिवसांपूर्वी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Solapur Market Committee) एका कांदा उत्पादक (Onion) शेतकऱ्याची क्रूर थट्टा झाल्याचा प्रकार पहायला मिळाला होता. सोलापुरच्या बार्शी तालुक्यातील शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी 17 फेब्रुवारीला पाच क्विंटल कांदा सोलापूर मार्केट यार्डातील सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याकडे विकला. मात्र गाडीभाडे, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करुन शेतकऱ्याचा फक्त दोन रुपये मिळाले.10 पोती कांदे विकल्यानंतर शेतकऱ्याला दोन रुपयांचा चेक देण्यात आला. यावरुन मोठा वाद झाला. यानंतर संबधीत  व्यापाऱ्यावर कडक कारवाई करण्यात आली.


शेतकऱ्याच्या प्रश्नावरुन सभागृहात गदारोळ


शेतकरी मेटाकुटीला आला तरी नाफेडकडून हरभरा खरेदी झालेली नाही. मराठवाड्यातला शेतकरी संकटात, तर कोल्हापूरात वांग्याला 27 पैसे किलोचा दर  मिळाला. शेतकऱ्याच्या प्रश्नावरुन सभागृहात देखील मोठा गदारोळ झाला. अवकाळीमुळे शेतक-यांचं झालेल्या नुकसानीवर स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा करण्यास सरकारनं नकार दिला. त्यामुळे विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. सरकारविरोधात घोषणाबाजी करत विरोधक सभागृहातून बाहेर गेले.