पुणतांबा : पुणतांबामधल्या अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या दोन्ही मुलींना पोलिसांनी बळाचा वापर करत अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात  दाखल केलंय. पुणतांबातल्या आंदोलक तीन मुलींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. चौथ्या दिवशी या मुलींची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली होती. शुभांगी जाधवला जास्त त्रास होवू लागल्यानं गुरुवारी रात्रीच तीला रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. त्यानंतर पूनम आणि निकीतालाही उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली होती मात्र त्यांनी नकार दिला होता.


वजन घटलं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल पालकमंत्री राम शिंदे यांनीही मुलींना उपोषण सोडण्याची विनंती केली होती तरीही या दोन्ही मुलींनी ऐकले नाही. त्यात संध्याकाळी डॉक्टरांनी या मुलींची वैद्यकीय तपासणी केली असता मुलींचं वजन घटलं होतं आणि युरीन मधली किटॉनची मात्रही वाढली होती. त्यामुळे प्रशासनानं रात्री महिला पोलिसांकडून या मुलींची जिल्हा रुग्णालयात रवानगी केली आहे. दरम्यान रुग्णालयात जाण्यास मुलींनी विरोंध केला होता तसंच निकीताचे वडील धनंजय जाधव यांनीही विरोध केला असता त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.


ठाकरेंशी चर्चा निष्फळ



पुणतांब्यातील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या मुलींनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी  फोनवरुन चर्चा केली होती. अन्नत्याग करणाऱ्या या मुलींची शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंशी चर्चा घडवून आणली. या मुलींच्या आंदोलनाविषयी आपण मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यानुसार ठाकरेंच्या सांगण्यावरुन कृषी राज्यमंत्री अर्जुन खोतकर पुणतांब्याकडे येण्यासाठी निघाल्याची माहिती खासदार लोखंडेंनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबामध्ये गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शेतकरी कन्यांची दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी भेट घेत चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली.