ऐन पावसात अचानक जमीनीतून धूर निघतोय, दगड भाजून काळे पडलेत आणि... हिंगोली येथील गूढ प्रकार
राज्यभरात पावासाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वत्र वातावरण थंड झाले आहे. हिंगोलीत जमीन मात्र अचानक तापली आहे.
Hingoli News : माळ रानावरील जमीन तापली. त्यातून अचानक धूर निघाले आणि दगड देखील भाजून काळे पडले. हिंगोलीत हा गूढ प्रकार घडला आहे. यामुळे नागरिक भयभित झाले आहे. हा प्रकार निदर्शनास येताच ग्रामस्थांनी तात्काळ याबाबत तहसील कार्यालयाला माहिती दिली. यानंतर आता हे नेमकं कशा मुळे घडलं याचा तपास केला जाणार आहे.
नेमका काय प्रकार घडलाय?
हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा शिवारातील माळरानावर हा प्रकार घडला आहे. जमिनीतून अचानक धूर निघत असून तेथील जमीनही गरम होत आहे. लक्ष्मण नाईक तांडा येथील एका लोखंडी खांबाजवळ जमिनीतून अचानक धूर निघतोय. तसेच तेथील जमीनही गरम झाली आहे. जमिनीतून धूर निघत असल्याची माहिती नागरिकांनी तहसील कार्यालयाला कळवली होती.
येथील विजेचा लोखंडी पोल ही खाली कोसळून पडला असल्याची माहिती नागरिकांनी दिली. काही दिवसांपासून येथील जागेतून धूर निघत आहे. तेथील दगड काळे पडले आहेत. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. आज तलाठी एम. एफ. फोपसे, मंडळ अधिकारी सुरेश बोबडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच महावितरण वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता अश्विन कुमार मेश्राम यांनी सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली. नेमका काय प्रकार आहे याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अनोख्या अळीचे गावात थैमान
काही महिन्यापूर्वी औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील वजनापूर गावात अनोख्या अळीने गावात थैमान घातले होते. वजनापूर सह परिसरातील पंचक्रोशीतील शेतकरी व गावकरी भयभीत झाले होते. एखाद्या लष्कराच्या पथसंचालनासारखे या अळ्या एका रांगेत लयबद्ध पद्धतीने चालतांना दिसत होत्या. दहा ते एकशे वीस फुटांच्या रांगा पाहिल्यावर या अळ्या माणसावर हल्ला करतात काय अशी भीती गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाली होती. या अळ्या जमीनीतून निघून एकत्र पद्धतीने पुढे चालत असतात. या अळ्या नुसत्या चालतच नसून वेगवेगळे आकार ही दाखवत होत्या. सरळ चालतांना सापसारख्या दिसणाऱ्या अळ्या, क्षणात ऑक्टोपस सारखा आकार धारण करत होत्या.