गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम :  असं म्हणतात शेतक-याचा नाद कधीच करायचा नाही, शेतकरी कधी काय करेल याचा नेम नाही. वाशिमच्या अशाच एका शेतक-यानं जनावरं आणि चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक नामी शक्कल लढवली. आता हा शेतकरी घरात बसूनही आपल्या शेताची राखण करू शकतो.  वाशिमच्या शेतकऱ्याने शेतीवर नजर ठेवण्यासाठी चक्क शेतात CCTV कॅमेरे लावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठी दुकाने,ज्वेलरी शॉप येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचे आपण नेहमीच पाहत असतो. पण, वाशिम जिल्ह्यातील लोणी येथील शेतकऱ्याने चक्क शेतातच दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.  शेताचे सरंक्षण करण्याचा अफलातून प्रयोग या शेतकऱ्याने केला असून तो यशस्वी झाला आहे.


एकीकडे शेती आधुनिक होत असली तरी मात्र शेतकऱ्यांना शेतमाला सह कृषी साहित्याची चोरी, वन्य प्राण्यांकडुन शेतीचे नुकसान आदी बाबीचा सामना करावा लागत आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लोणी येथील प्रयोगशील शेतकरी अनिल बोडखे यांनी सहा एकर क्षेत्रामध्ये भाजीपाला वर्गीय पिकाची लागवड केलेली आहे. पण मोकाट जनावरे व चोरट्यांमुळे त्यांचे मोठे नुकसान होत होते. या सर्वांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी या शेतकऱ्यांने चक्क शेतामध्ये सौर ऊर्जेवरील चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.


या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे त्यांना रात्री सुद्धा शेतीची राखण करणे सोयीचे झालेले आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी त्यांना 18 हजार रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले आहे.  शेतीचे संरक्षण करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणारे वाशिम जिल्ह्यातील हे प्रथम शेतकरी असल्याचे मानले जात आहे.  हा अफलातून प्रयोग पाहण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी लोणी येथे येत आहेत. 


सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यापासून बोडखे यांना आपल्या शेतात जाणे येण्याचे काम सुद्धा कमी पडत आहे. घरबसल्या ते आपल्या शेतातील सर्व हालचालीवर नजर ठेवून आहेत. यामुळे आजूबाजूचे शेतकरी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या स्वतःच्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या तयारी दिसत आहेत असेही बोडखे यांनी सांगितले. त्यामुळे सदर हा प्रयोग वाशिम जिल्ह्यातही नव्हे तर आता अन्य जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे.


लोणी येथील बोडखे हे नेहमी कोणते ना कोणते नवनवीन प्रयोग करून आपल्या शेतात  विविध प्रकारचे पिके घेत असतात. त्यांनी लावलेल्या कॅमऱ्यांमुळे ते आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोगामुळे सध्या चर्चेत आलेले आहेत. किमान शेतामध्ये शेतीचे संरक्षण करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणारे अनिल बोडखे हे प्रथम शेतकरी असल्याचे मानले जात आहे.