पश्चिम महाराष्ट्र, गडचिरोलीत मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण
राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाने गडचिरोतीलीतल पर्लकोटा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. तर कोल्हापूर, सांगलीतही संततधार पावसामुळे पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे.
कोयना, वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग
सांगतील पुराचा धोका वाढला आहे. कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पुन्हा नदीकाठावर पुराची धास्ती निर्माण झाली आहे. वारणा नदी पात्रा बाहेर गेली आहे. शिराळा ताल्युक्यातील वारणा नदीवरील चार पूल पाण्याखाली गेले आहेत. काखे - मांगले, आरळा- शित्तुर, चरण-सोंडोली, कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेले असून, शिराळा आणि शाहूवाडी ताल्युक्यातील गावाचा संपर्क तुटला आहे.
तसेच वारणा नदी काठच्या शेतात नदीच पाणी शिरले आहे. दरम्यान सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी २९ फुटावर गेली आहे.३० फुटांनंतर शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आणि मगरमच्छ कॉलनी या परिसरात पाणी शिरते. त्यामुळे प्रशासनाने, लोकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
पंचगंगा नदीने धोक्याची पातळी
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुराचे संकट कायम आहे. गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी ४० बंधाऱ्यावर नदीचे पाणी येवून ६० हून अधिक थेट संपर्क तुटला असून या गावांना पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
गडचिरोली जनजीवन विस्कळीत
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आल्यानं गेल्या तीन दिवसांपासून सुमारे शंभर गावांचा संपर्क तुटलाय. या नदीचे पात्र आज पुन्हा फुगल्यानं गावात पाणी शिरल्याचं वृत्त आहे. त्यामुळं नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शैक्षणिक संस्थांना दोन दिवसांची सुटी जाहीर केली आहे. हवामान विभागानं दिलेला इशारा जिल्ह्यात तंतोतंत खरा ठरला आहे. जिल्ह्यातील १२ पैकी सात तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.
वडसा, भामरागड, गडचिरोली, धानोरा, आरमोरी, कुरखेडा, एटापल्ली या तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, यातील वडसा इथं २१२ मिमी एवढा प्रचंड पाऊस कोसळला. यापैकी धानोरा तालुक्यातील रांगी येथे लगतचा नाला तुडुंब भरल्याने गावातील रस्ते नद्यांत परिवर्तित झाले आहे. उद्याही अशाच पावसाची शक्यता व्यक्त केली गेली आहे. जिल्ह्यानं वार्षिक सरासरी ओलांडली असून आतापर्यंत १८ टक्के पाऊस अधिक झाला आहे. या पावसामुळं आठ प्रमुख मार्ग बंद असून, यात आलापल्ली-भामरागड आणि आरमोरी-वडसा या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. प्रशासन स्थितीवर लक्ष ठेऊन आहे.