पुणे : पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे सध्या चर्चेत आहेत, ते कारवाई मुळे. कर्मचाऱ्यांवर कारवाई, भाड्याच्या बसवर कारवाई असा धडाकाच त्यांनी लावला आहे. त्यामुळे कर्मचारी आणि ठेकेदार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पण, मुंडे फक्त कारवाई करत नाहीत तर त्यांनी पीएमपीएलची प्रवासी संख्या आणि उत्पन्न देखील वाढवून दाखवलंय. एप्रिल आणि मेच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमपीएलचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात मुंडे यांनी कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या शेकड्यांमध्ये गेलीय. कर्मचाऱ्यांबरोबर मुंडे यांनी बडगा फिरवला तो भाड्याच्या बसवर... मुंडे यांच्या कारवाई मुळे हे दोन्ही घटक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मुंडे फक्त कारवाई करतात . पीएमपीएलच्या उत्पन्न आणि प्रवाशांवर त्याचा काही परिणाम झालाय का... अशी शंका घेतली जात होती. पण मागील दोन महिन्यात पीएमपीएल रुळावर येताना दिसतेय.


भाड्याच्या बस वगळता, पीएमपीएलच्या ११०० बस रस्त्यावर धावत होत्या... मात्र मुंडेंनी चार्ज घेतल्यावर एप्रिल आणि मे महिन्यात ही संख्या वाढली. या दोन महिन्यात १५०० बस रस्त्यावर धावत आहेत. प्रवाशांची संख्याही सात लाखांवरून , साडे आठ लाखांवर गेली आहे. तर या दोन महिन्यात साधारणतः सहा कोटींनी उत्पन्न वाढलंय.


प्रवासी संख्या उत्पन्न हे दिसणारे बदल असले तरी इतर अनेक बदल पीएमपीएलमध्ये होत आहेत. कर्मचाऱ्यांची उपस्थिती, कामाच्या वेळा, बसची दुरुस्ती अशा आघाड्यांवर देखील मोठे बदल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सध्या तरी मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे पीएमपीएलची गाडी रुळावर येताना दिसतेय. पण मुंडे किती दिवस राहतात आणि त्यांना कर्मचारी कशी साथ देतात, यावर पुण्यातील प्रवाशांचे भवितव्य अवलंबून आहे .