मुंबई / राज्यातील ठिकठिकाणचे प्रतिनिधी : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा भारताने १२ दिवसानंतर बदला घेतला. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून बॉम्ब हल्ला चढवला. या हल्ल्यात पाकिस्तान हद्दीतील बालाकोट येथील अतिरेक्यांचे अड्डे उद्धवस्त केलेत. यासाठी 'मिराज २०००' या लढावून विमानांचा वापर करण्यात आला. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून अतिरेक्यांच्या तळावर हल्ला केला त्यामध्ये ३०० च्या वर अतिरेकी ठार झाले आहेत. या कारवाईनंतर देशात जल्लोष साजरा होत असताना मुंबईसह राज्यातील जनतेने या कारवाईबद्दल आनंद व्यक्त करताना पाकिस्तानला योग्य धडा शिकवलाय, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तसेच ठिकठिकाणी जल्लोष रॅली काढण्यात येत आहे. काही ठिकाणी ढोलताशे वाजवून आनंद साजरा करण्यात आला आहे.


 भारत माता की जयचे नारे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. मुंबईकर रेल्वे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. पाकिस्तानची नांगी कायमची ठेचा आणि त्यासाठी असे सर्जीकल स्ट्राईक सातत्याने करा, अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे. तर या हल्ल्यानंतर भारतीय नागरिकांमध्ये जोश निर्माण होत आहे. यामध्ये युवकांचा जास्त जोश आहे. घाटकोपरमध्ये १०० युवकांनी एकत्र येऊन घाटकोपर स्टेशन पूर्वेला ढोलताशे वाजवून फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जयचे नारे दिलेत. त्याचबरोबर हल्ल्याची वृत्त समजताच नागरिक घराबाहेर पडून ढोल-ताशाच्या गजरात जल्लोष करत आहेत. 


सातारा : फटाके वाजवून आनंदोत्सव 


पाकिस्तानात असलेल्या अतिरेक्यांच्या छावण्यांवर भारताच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष केला जातो आहे. साताऱ्यातील मोती चौक या ठिकाणी नागरिकांनी फटाके वाजवून आणि सातारी कंदी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे. पाकिस्तानला चांगला धडा शिकवला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत. तसेच माजी सैनिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अशाच पद्धतीने भारताच्या सैन्य दलाने पाकिस्तानला जशास तसे उत्तर या आधी सुद्धा दिले आहे. यापुढेही आपले सैन्य देईल, असा विश्वास या निवृत्त सैनिकांनी व्यक्त केला आहे.


नांदेडमध्ये नागरिकांमध्ये जल्लोष 


पुलवामा हल्याचा बदला घेतल्याने सामान्य नागरिकांमध्ये जल्लोषपूर्ण वातावरण आहे. तरुणांपासून वयोवृद्धांमध्ये उत्साह संचारला आहे. अशी भारतीय सैन्याने कारवाई करावी आणि पाकिस्तानला चोख उत्तर यापुढे द्यावे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


भोर : अभिमान वाटेल अशी कामगिरी 


पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. आज प्रत्येक भारतीय जल्लोष आणि आनंद व्यक्त करीत आहे. अभिमान वाटेल, अशी कामगिरी भारतीय वायू सेनेनी केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. भोरमधील माजी सैनिक यांनी संपूर्ण गावात सरबत वाटून आनंद आणि जल्लोष साजरा केला. टँकर भरून थंड सरबत वाटण्यात आले. 


वर्ध्यात जल्लोष साजरा


पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त कश्मीरमधील जैश ए महमदच्या तळावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर वर्ध्यात जल्लोष करण्यात आला. वर्ध्यात शिवाजी चौकात तरुणांनी तिरंगा ध्वज फडकवत आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी करीत आणि ढोल ताशाच्या गजरात, भारत माता की जय च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी पाकिस्तान विरोधी नारे देत भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यात आले.


सिंधुदुर्गात जयघोष करत मोठी रॅली


पुलवामा येथिल दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवानांना विरमरण आल्यानंतर भारतीय वायुदलाने आक्रमक पवित्रा घेत दहशतवादी हल्ल्यास जशास तसे उत्तर दिले आहे. पाकिस्तानमधिल दहशतवादी अड्डयावर हल्ले करून अनेक दहशतवाद्यांना कंठस्थान घातले. याचा आनंदोत्सव म्हणून देवगड जामसंडे येथील बॉडिटेंपल सदस्यां समवेत युवा वर्गाने जामसंडे दिर्बादेवी मंदिर ते देवगड एसटी स्टँड या मार्गावर भारत मातेच्या जयघोषात भव्य रॅली काढली. तर मालवणमध्येही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सिंधुदर्गमधील निवृत्त एअर फोर्स अधिकऱ्यांशी समाधान व्यक्त केले.


सांगलीत फटाके फोडून आनंद व्यक्त


भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर मिरजमध्ये जल्लोष करण्यात येत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी मिरज मार्केट परिसरात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी साखर आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय सैन्य आणि भारताच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.


नाशकात भारतीय ध्वज घेत विजयाच्या घोषणा


भारतीय हवाई हल्ल्यांचा जल्लोष आज भोसला लष्करी महाविद्यालयात करण्यात आला. येथील रणगाड्यावर चढून विद्यार्थ्यांनी हातात भारतीय ध्वज घेत विजयाच्या घोषणा दिल्या. आजही सांगितल्यास आम्ही सीमेवर जाण्यास तयार आहोत, असे उत्साहात सांगत त्यांनी 'हमसे जो टकरायेगा' या उस्फूर्त घोषणा देत पाकिस्तानचा भ्याड हल्ला करण्याबाबत निषेध केला.  


सोलापूर : पाकिस्तानला जबरदस्त हिसका


भारतीय वायुदलाने हल्ला करत पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करुन पाकिस्तानला जोरदार दणका दिला आहे.  भारताने आज पाकिस्तानला जबरदस्त हिसका दिला. या कामगिरीबद्दल भारतीय लष्कराचे कौतुक आहे, असे म्हणत नागरिकांनी जल्लोष साजरा केला.


जळगावात तिरंगा फडकवत आनंद साजरा


भारतीय सैन्य दलाच्या हल्ल्यानंतर जळगावात सामाजिक संघटनांनी आनंदोत्सव साजरा केला. शहरातील टॉवर चौकात नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन फटाक्यांची आतषबाजी करत तसेच एकमेकांना पेढे तसच मिठाईचे वाटप करून आनंद व्यक्त केला. पुलवामा या हल्ल्याचा बदला घ्यावा, अशी मागणी होत असताना भारतीय सैन्य दलाच्या मिराज विमानांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास एलओसी ओलांडून पाकिस्तानातील बालाकोटवर एअर स्ट्राईक करत अनेक दहशतवादी तळ उदध्वस्त केली. पुलवामा घटनेचा जोरदार बदला घेतल्याने जळगावात फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून तसेच ढोल तसंच ताशांचा गजर करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी भारतीय तिरंगा फडकावून भारतीय सैन्य दलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.


लातूर : बाजारपेठेत फटाके फोडून आनंद


लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोठा जल्लोष केला जात आहे. निलंगा तालुक्यातील निटूर येथे ही फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. निटूर गावातील मुख्य बाजारपेठेत फटाके फोडून त्यानंतर मिठाई वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, वंदेमातरमचा जयघोषही करण्यात आला. तसेच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. भारताने उचललेले पाऊल हे योग्य आहे. पुलवामा हल्ल्यानंतर अशाच पद्धतीच्या प्रतिउत्तराची गरज होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.


धुळे : पेढे वाटून आनंदोत्सव साजरा


भारतीय जनता पार्टीच्यावतीने फटाके फोडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजप महानगराच्या कार्यकर्त्यानी फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी पेढे वाटून आनंदउत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांना पेढे वाटत भारतीय सैन्याचा जय जयकार करण्यात आला. दरम्यान, शहीद झालेल्या सर्वच सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेतल्याचा अभिमान आणि आनंद वाटतो अशी प्रतिक्रिया बुलडाणा जिल्ह्यातील शहीद जवान नीतीन राठोड यांच्या वडिलांनी दिली आहे.