मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. असे असताना कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झालेल्या दोघा पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाखाची मदत आणि नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्याचवेळी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरु असलेल्या लढाईमध्ये पोलीस अत्यंत कठीण अशा परिस्थितीत काम करत आहे. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दरम्यान, राज्यात पोलिसांसाठी स्वतंत्र दक्षता कक्ष उभारण्यात येणार असल्याचे अनिल देशमुख म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात पोलिसांची सुरक्षा महत्वाची आहे. प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिसाला तसेच पोलीस अधिकाऱ्याला तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष सुरु करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून यात नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती देखमुख यांनी दिली.



दरम्यान, जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारच्या कक्ष निर्माण करतील. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.


येस बँक घोटाळ्याप्रकरणी आरोप असलेले धीरज आणि कपिल वाधवान या दोघांना रविवारी सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर त्यांच्या कुटुंबातल्या इतर लोकांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले. या कुटुंबाला महाबळेश्वर येथे जाण्यासाठी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी पत्र दिलं होते. मानवतेच्या आधारावर हे पत्र देण्यात आल्याचे गुप्ता यांनी चौकशी समितीला सांगितल्याचे देशमुख म्हणाले. त्यामुळे पत्र देण्याबद्दल त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता हे स्पष्ट झाले आहे, तसेच या चौकशी अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितले.