Indian Railway : सुट्ट्यांचे दिवस आणि त्यातच प्रवाशांचा वाढणारा आकडा या गोष्टी लक्षात घेत भारतीय रेल्वेच्या वतीनं सुट्ट्यांच्या या माहोलात विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात येतो. भारतीय रेल्वे विभागाच्या या Vacation Special / Summer Special ट्रेनना प्रवाशांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. रेल्वे विभागाच्याच कोकण रेल्वे मार्गावर याची सातत्यानं प्रचिती येत असते. गणपती, शिमगा आणि अगदी मे महिन्याची सुट्टी, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे कैक मार्गांनी प्रवासाची सोय उपलब्ध करून देते. पण, याच कोकण रेल्वेचा खोळंबा होण्याची चिन्हं आता दिसू लागली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकदोन नव्हे, तर तब्बल 28 दिवसांसाठी रेल्वे विभागाकडून घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकचा थेट परिणाम रेल्वे प्रवासावर आणि परिणामी अनेक प्रवाशांवर होताना दिसणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या माजोर्डा ते मडगाव विभागात येणाऱ्या रेल्वेच्या उड्डाणपुलाचं बांधकाम हाती घेण्यात येणार असल्यामुळं 2 मे ते 29 मे या कालावधीदरम्यान Konkan Railway मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्ट


गोवा आणि त्यापुढं जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर या ब्लॉकचा अधिक परिणाम होताना दिसणार असून, कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्याही या कामामुळं प्रभावित होणार आहेत. सध्याच्या घडीला सुट्ट्याचे दिवस आणि येऊ घातलेलं मतदान अर्थात लोकसभा निवडणुकीचा पुढचा टप्पा तोंडावर असल्यामुळं मूळ गावांच्या दिशेनं जाणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. पण, मेगाब्लॉकमुळं आता प्रवाशांना वेळेचं नियोजन करत पुढील  बेत आखावे लागणार आहेत. 


कोणकोणत्या रेल्वेगाड्यांवर होणार परिणाम? 


कोकण रेल्वेच्या या ब्लॉक कालावधीत 16345 लोकमान्लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेस ही ट्रेन करमाळी ते रत्नागिरीदरम्यान जवळपास 1 तास 10 मिनिटं उशिरानं धावेल. परिणामी एरव्ही 30 तास 10 मिनिटं प्रवास करणाऱ्या या ट्रेनच्या प्रवासात आणखी तासाभराची भर पडणार आहे. 


17310 वास्को द गामा - यशवंतपूर एक्स्प्रेस पहिल्या स्थानकातूनच 40 मिनिटं उशिरानं निघणार असल्यामुळं तिचा पुढील प्रवासही दिरंगाईनं चालेल. याव्यतिरिक्त हापा- मडगाव, पोरबंदर - कोचुवेली आणि जामनगर- तिरुनेलवेली या डाऊन मार्गांवर जाणाऱ्या गाड्यांना प्रवासासाठी जास्तीचा वेळ लागेल. अप मार्गावर येणाऱ्या गाड्यांनाही या ब्लॉकचा थेट फटका बसेल. मडगाव नागपूर, मंगळुरू- मुंबई मत्स्यगंधा, वास्को द गामा - पाटणा या गाड्यांच्या प्रवासवेळांमध्येही ब्लॉकमुळं वाढीव वेळाची भर पडेल याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. पूर्वनियोजित प्रवासासाठी निघणाऱ्या प्रवाशांनीसुद्धा त्यांच्या आरक्षित तिकीटांच्या अनुषंगानं रेल्वेकडून सातत्यानं देण्यात येणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावं.