WHITE STRAWBERRY :  स्ट्रॉबेरी म्हटलं की रंगाने लाल चुटूक आणि चवीने थोडी आंबट असे फळ आपल्याला माहिती आहे. लालबुंद रंगाची स्ट्रॉबेरी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते. प्रथमच लाल नाही तर पांढऱ्या शुभ्र स्ट्रॉबेरीचे पिक घेण्यात आले. भारतातील पहिला अनोखा प्रयोग महाराष्ट्रात करण्यात आला आहे. या प्रयोग यशस्वी देखील झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यातील महाबळेश्वर, भीलार, वाई भागात स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जाते. पण, साताऱ्यातील वाई फुलेनगर येथील प्रयोगशील शेतकरी उमेश खामकर यांनी अर्ध्या एकरामध्ये चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. ही पांढरी स्ट्रॉबेरी विकायला सुरुवात देखील झाली आहे. हटके प्रयोग करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.


सध्या काही ठिकाणीच त्यांनी ही फळे विक्रीसाठी ठेवली आहेत. लवकरच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही ही विक्री होणार आहे. विशेष म्हणजे अडीचशे रुपये किलोने सामान्य स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेण्यापेक्षा या पांढरी स्ट्रॉबेरीला 1 हजार ते 1500 रुपये किलो भाव मिळतो आहे. हा देशातील पहिला प्रयोग असून फ्लोरिडा पर्ल जातीच्या स्ट्रॉबेरीचे पीक पहिल्यांदा अमेरिका आणि युकेमध्ये घेण्यात आले. 


या अनेख्या पांढऱ्या शुभ्र स्ट्रॉबेरीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पुढे वेगवेगळ्या भागांमध्ये याचे उत्पन्न घ्यायला सुरुवात झाली. भारतात मात्र हा प्रयोग करण्यासाठी पहिला प्रयत्न उमेश खामकर यांनी केला. यासाठी फ्लोरिडा विद्यापीठाची रॉयल्टी राइट्स त्यांनी विकत घेतले. त्यामुळे भारतात कुठेही या स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घ्यायचे असेल तर त्यासाठी खामकर यांची परवानगी लागणार आहे.


नोकरी सोडून स्ट्रॉबेरी शेती यशस्वी करून दाखवली


सोलापूरच्या करमाळ्यात एका अभियंत्यानं नोकरी सोडून स्ट्रॉबेरी शेती यशस्वी करून दाखवलीय. उजनीच्या काठावरील शेटफळ भागात ही स्ट्रॉबेरीची शेती फुललीय. अर्धा एकर शेतीवर स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली असून, यातून चार टन उत्पादन अपेक्षित आहे.


पालघरमधल्या वसई तालुक्यात स्ट्रॉबेरीचं यशस्वी उत्पादन


स्ट्रॉबेरीचं आता पालघरमधल्या वसई तालुक्यातही यशस्वी उत्पादन घेण्यात आले होते. सेवा विकेक प्रकल्पाचे राकेश अधिकारी या तरुण शेतक-याने प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरीची मल्चिंग पद्धतीनं लागवड केली. त्यांच्या या प्रायोगिक लागवडीचं सर्वत्र कौतुक करण्यात आले.