अहमदनगर : हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी सम-विषम वादावर अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता, पण भावना दुखावल्या असल्यास आपण मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असं इंदुरीकर महाराज यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्टीकरण देत, दिलगिरी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सम तारखेला संभोग केल्यास पुत्र होतो, तर विषम तारखेला केल्यास कन्या होते, असं विधान त्यांनी आपल्या कीर्तनादरम्यान केलं होतं, यावर इंदुरीकर महाराज यांच्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती, तर काहींनी थेट कायदेशीर तक्रार दाखल करत, इंदुरीकर महाराज अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप केला होता.


या दरम्यान इंदुरीकर महाराज यांनी सावध पवित्रा घेत वादावर काहीही बोलणार नसल्याचं सांगत मौन पाळलं होतं, तर इंदुरीकर यांच्या चाहत्यावर्गाने इंदुरीकर यांचं मोठ्या प्रमाणात समर्थन देखील केलं आहे, तरी देखील इंदुरीकर महाराज यांनी आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचं सांगितलं.


इंदुरीकर यांनी या वादानंतर आता खूप झालं, आता फेटा ठेवून देणार, कीर्तन सोडून शेती करणार असं देखील म्हटलं होतं, पण त्यांच्या चाहत्यांनी महाराज कीर्तन सोडू नका अशी विनंती देखील त्यांना केली होती. 



इंदुरीकर यांच्या चाहत्यांनी चलो नगरचा नारा इंदुरीकर यांना पाठिंबा देण्यासाठी काढण्याचं ठरवलं होतं, पण कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर करा आणि एकत्र जमण्याचा कोणताही प्रयत्न न करता, शांतता ठेवा असं आवाहन हभप इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं.