कोपरगाव : गेली २५ वर्षं मी तुम्हाला हसवायचं काम केलं. पण आता मलाच रडायची वेळ आली आहे. माणूस मोठा झाला की, त्याला संपवण्याची काही लोक पैजच लावतात, अशा शब्दांत निवृत्ती महाराज देशमुख इंदूरीकर यांनी रविवारी आपली व्यथा बोलून दाखवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवजयंतीच्या निम्मिताने कोपरगावात आयोजित कीर्तनात ते बोलत होते. सर्व कॅमेरे बंद केल्याशिवाय कीर्तन सुरू करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आणि त्यानंतरच कीर्तनाला सुरुवात केली. मीडियावर एक पट्टी सोडताना जरा विचार करा.. समोरच्या माणसालाही प्रपंच आहे, त्यालाही कुटुंब आहे, असं भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केलं.


तृप्ती देसाईंनी कालच इंदूरीकर महाराजांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यानंतर या कार्यक्रमात इंदूरीकर महाराज काय बोलणार? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.


गेल्या काही दिवसांपासून इंदूरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. २८ फेब्रुवारीला कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात इंदूरीकर महाराजांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण अनिंस आणि काही संघटनांनी विरोध केल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.