Indurikar Maharaj On Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचं मागील पाच दिवसापासून आंदोलन (Maratha Reservation Protest) सुरू असून राज्यभरातील मराठा समाज बांधव मनोज जरांगेंना साखळी उपोषणाबरोबरच निषेध करून पाठिंबा देत आहे. महाराष्ट्रभरामध्ये नावाजलेले कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांनी देखील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी इंदोरीकर महाराजांनी पाठिंबा दिला असून उद्या पासून पुढचे 5 दिवस इंदोरिकर महाराजांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी इंदोरीकर महाराज देखील मैदानात उतरले असून उद्यापासून पुढचे 5 दिवस एकही कार्यक्रम आणि कीर्तन न करण्याचा निर्णय इंदुरीकर महाराजांनी घेतला आहे. ही माहिती झी २४ तासला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज जरांगे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून पोटात अन्नपाणी नसल्यानं मनोज यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना आता बोलताना त्रास होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना पाणी पिण्याचं आव्हान केलं होतं. त्यानंतर त्यांनी फक्त घोटभर पाणी घेतलं. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपचार न घेण्याचा निर्धार मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी केला आहे. आरक्षण हेच माझे उपचार असे म्हणत आपण आरक्षण घेऊच, असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.


कोणीही आत्महत्या किंवा उग्र आंदोलन करू नये असं, आवाहनदेखील मनोज जरांगे यांनी मराठा समाज (Maratha Community) बांधवांना केलं आहे. शांततेच्या मार्गानेच मराठ्यांना आरक्षण मिळणार असून सर्वांनी आपली एकजूट कमी होऊ देऊ नका, असं म्हणत त्यांनी आंदोलनाला शांततेची दिशा दाखवली आहे. तर दुसरीकडे मराठा नेते आंदोलनात आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता मराठा नेते आरक्षणासाठी एकवटील का? असा सवाल विचारला जात आहे.


आणखी वाचा - मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा; आणखी कोण आहे राजीनामा देण्याच्या तयारीत?


दरम्यान, या पुढं माझं कुटुंब माझ्या समोर पुन्हा आणू नका, कारण कुटुंब पाहिलं की माया येते आणि उपोषणावार परिणाम होतो पुन्हा माझ्या कुटुंबाला इथं आणू नका, असं मनोज जरांगे यांनी म्हणत कार्यकर्त्यांना खडसावलं होतं. तुमचा मुलगा मेला तरी रडू नका,  असं आवाहन जरांगे यांनी कुटुंबाला केलंय. आरक्षण मिळाल्याशिवाय हटणार नाही मेलो तरी नाही. आरक्षण द्या नाही तर मराठ्यांशी लढा,हे दोनच पर्याय सरकार सामोर आहे, असं म्हणत जरांगे यांनी सरकारच्या घाम फोडला आहे.