बापाच्या कुशीतच दोन महिन्यांच्या लेकीने जीव सोडला, पालघरमध्ये मन सून्न करणारी घटना
Infant Dies In Palghar: दुर्गम भागातील सोयी-सुविधांच्या आभावी अनेकांचे बळी जात असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
Palghar Rain Update: राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळं नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरूच आहे. दुर्गम भागात पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होते. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचे मार्गही बंद होतात. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहेत. पावसामुळं रस्ता बंद झाल्याने पालघरमध्ये अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. (Palghar 2 Month Girl Died Due To Rain)
पुरामुळे रस्ते बंद झाल्याने विक्रमगडमधील एका दोन महिन्याच्या चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्याने बंधारा पाण्याखाली गेला आणि पाड्यावरून दवाखान्यात जाणारी वाटच बंद झाली. विक्रमगडमधील मलवाडा म्हसेपाडा येथे राहणारी लावण्या नितीन चव्हाण ही चिमुकली दोन दिवसांपूर्वी अचानक तापामुळे आजारी पडली. तिच्यावर उपचार सुरु होते. अचानक तिला श्वसनाचा जास्त त्रास होऊ लागला.
लावण्याची तब्येत अचानक बिघडल्याने कुटुंबीय काळजीत पडले. त्यांनी तिला उपचारासाठी मलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांच्या लेकीला कुशीत घेऊन तिचे वडिल घरातून निघालेही मात्र बांधारा पाण्याखाली गेल्याने त्यांना वेळेत रुग्णालयात पोहोचणे शक्य झाले नाही. त्यामुळं वेळेत उपचार न मिळाल्याने लावण्याचा उपचाराअभावी मृत्यू झाला. वडिलांच्या हातातच मुलीने जीव सोडला. सोयी-सुविधा नसल्याने लावण्याचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर, चिमुकल्या मुलीच्या मृत्यामुळं ग्रामस्थही हळहळले आहेत.
पावसाळ्यात म्हसेपाड्याला गारगाई आणि पिंजाळ या दोन नद्यांचे पाणी वेढा घालते. अशावेळी पाड्याबाहेर पडण्यासाठी येथील ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन काही उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
अकोल्यात दहा वर्षांचा मुलगा वाहून गेला
अकोला शहरात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मोर्णा नदीसह अनेक नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसात शहरातील खैर मोहम्मद प्लॉट परीसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पावसाचा आनंद लुटत असताना येथील नाल्याच्या पुरात 10 वर्षाचा मुलगा वाहून गेला आहे. जियान अहमद इक्बाल अहमद अस या मुलाचे नाव आहे. पावसाच्या पाण्यात खेळण्यासाठी जियान आणि त्याचे मित्र घराबाहेर पडले होते. दरम्यान जियान याची चप्पल नाल्याच्या पाण्यात गेली. चप्पल वाहत असताना ती पकडण्यासाठी जीयान त्यामागे धावू लागला पाण्याचा आणि नाल्याचा अंदाज न आल्याने जियान पाण्यात वाहून गेला. जुने शहर पोलिस आणि मनपा अग्निशमन विभागाचे आपत्कालीन पथक जियानचा शोध घेत आहेत. दरम्यान परिसरातील एका सीसीटिव्हीमध्ये जियान वाहत गेल्याचा धक्कादायक घटनाक्रम दिसत आहे.