वेदनेनं कळवळणाऱ्या जीवाला शाळेनं दिलं जीवदान
सलमान खान जे करू शकला नाही, ते अमरावतीमधल्या एका छोट्या शाळेनं करून दाखवलंय... `बिईंग ह्युमन` म्हणजे नेमकं काय? याचंच हे एक उदाहरण...
दिनेश दुखंडे, झी मीडिया, अमरावती : सलमान खान जे करू शकला नाही, ते अमरावतीमधल्या एका छोट्या शाळेनं करून दाखवलंय... 'बिईंग ह्युमन' म्हणजे नेमकं काय? याचंच हे एक उदाहरण...
अपघातात हरीण जखमी
अमरावती-यवतमाळ रस्त्याने भरधाव वेगाने जात असलेल्या एका गाडीने एका हरिणाला शनिवारी सकाळी उडवलं... रस्ता ओलांडताना हरीण बेसावध होतं आणि ते अचानक गाडीसमोर आल्यानं चालकही... पण, या अपघातानंतर त्या गाडी चालकाला आपल्या धडकेनं जखमी झालेल्या हरणाची दया आली नाही. तो तसाच वेगानं पुढे निघून गेला... जखमी हरीण तशा अवस्थेतच रस्त्याला लागून असलेल्या अभिनव विद्यालयाच्या पटांगणात कसंबसं धडपडत आलं...
वेदनेनं कळवळलेला जीव
गाडीची धडक इतकी जबरदस्त होती की हरिणाच्या दोन्ही डावे पाय निकामी झाले होते. तुटलेल्या पायाची हाडं बाहेर आली होती... वेदनांनी ते खूप विव्हळत होतं... आणि मग सुरु झाली 'बिईंग ह्युमन'ची गोष्ट... विद्यालयातल्या शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्या जखमी हरिणाला उचलून आधी सावलीत आणलं... त्याच्यावर प्रथमोपचार सुरु झाले... आधीच घबरा असलेला हा प्राणी आधीच अपघात आणि त्यात आजूबाजूला असलेल्या बघ्यांच्या गर्दीमुळं अजून बिथरला होता...
माणुसकीचं प्रात्यक्षिक
जखमी अवस्थेतच हरीण जमिनीवर पाय आपटू लागलं... त्यावेळी त्याला पाणी पाजून शांत करण्याचा प्रयत्नही शाळेचे कर्मचारी करीत होते... तोपर्यंत शाळेचे मुख्याध्यापक अशोक मानवतकरांनी बडनेऱ्यातल्या कंट्रोल रूमला फोन लावला... आणि अपघाताची कल्पना दिली... वनविभागाची एक टीम घटनास्थळी यायला निघाली...
हरणावर प्रथमोपचार
काही वेळात बडनेरातून निघालेली वनविभागाची टीम अभिनव विद्यालयात दाखल झाली... आणि हरीणावर उपचार सुरु झाले... हरिणाच्या जखमेतून बाहेर येत असलेलं रक्त थांबवण्यासाठी आणि जंतुसंसर्ग रोखण्यासाठी त्यावर हळद लावण्यात आली... मग, शाळेच्या आवारात असलेल्या झाडाच्या बारीक फांद्या तोडून हरिणाच्या तुटलेल्या पायाला बांधण्यात आल्या, जेणेकरून त्या जखमी पायांना तात्पुरता आधार मिळाला... वनविभागाची टीम मोटारबाईकने आली होती... त्यामुळे हरिणाला पुढील उपचारांकरिता रुग्णालयात नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी वनविभागाची गाडी बोलावली... या गाडीसोबत वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी आले.
दुर्गम गावात झालेला हा हरीणाचा अपघात, त्याचा जीव वाचवण्यासाठी एका शाळेनं केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा पाहून भारतातल्या एका सुपरस्टारची आवर्जून आठवण आली.... 'बिईंग ह्युमन'चे धडे देणाऱ्या सलमान खानला यातून प्रसंगातून बरंच काही शिकता येण्यासारखं आहे.
काळविटांची सर्रास शिकार करण्याचा आरोप असलेला आणि वर समाजाला 'बिईंग ह्युमन'चे कोरडे धडे देणारा सुपरस्टार सलमान खान एकीकडे, तर दुसरीकडे अमरावतीच्या आडगावातलं हे अभिनव विद्यालय... भरधाव गाडीने उडवलेल्या एका कोवळ्या हरणाला तत्परतेनं प्राथमिक उपचार देऊन या शाळेनं 'बिईंग ह्युमन'चं साक्षात उदाहरण समाजासमोर ठेवलंय, असं म्हणावं लागेल.