अंतिम वर्ष पदवी ऑनलाइन परीक्षा घोळाची चौकशी करा - युवा शिवसेना
अंतिम वर्ष पदवी ऑनलाइन परीक्षेच्या आयोजनात झालेल्या घोळाची चौकशी करण्याची मागणी युवा सेनेच्या मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्यांनी केली आहे.
मुंबई : अंतिम वर्ष पदवी ऑनलाइन परीक्षेच्या आयोजनात झालेल्या घोळाची चौकशी करण्यासाठी शोध समिती समिती स्थापन करावी, दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिवसेना प्रणित युवा सेनेच्या मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्यांनी केली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. कोविडच्या वातावरणात परीक्षेला सामोरे जात असताना परीक्षा आयोजनात झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थी नैराश्येच्या गर्तेत जाऊन जीवाचे बरे-वाईट करून घेऊ शकतात, अशी सिनेट सदस्यांनी भीती व्यक्त केली आहे.
पेपर पुढे ढकलण्याची नामुष्की
मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा पेपरमध्ये दुसऱ्या दिवशीही तांत्रिक गोंधळ झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झालेत. या गोंधळामुळे पेपर पुढे ढकलण्याची मुंबई विद्यापीठावर नामुष्की ओढवली आहे. शेवटच्या वर्षाच्या परीक्षांवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद रंगला. त्यात न्यायालयाने केंद्रातील युजीसीच्या बाजूने निर्णय दिला आणि परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या. पण सध्या विविध विद्यापीठांनी या ऑनलाईन परीक्षेत जो घोळ घातला आहे.
सोलापूर विद्यापीठातही गोंधळ
दरम्यान, ऑनलाईन परीक्षांचा घोळ संपता संपत नसल्याचे पुढे येत आहे. सर्व्हर क्रॅश झाल्याने सोलापूर विद्यापाठीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. ७ आणि ८ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षा २२ आणि २३ ऑक्टोबरला घेतल्या जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
गोंडवाना विद्यापीठाचे नवे वेळापत्रक
गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांचे नवे वेळापत्रक जारी केलंय. आता १२ ऑक्टोबरपासून परीक्षा होणारयत. सोमवारी परीक्षा सुरु झाल्या. पण सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण उद्भवल्यानं सकाळी नऊचा पेपर दुपारी दोन वाजता ठेवला. तरीही समस्या संपेना. अखेर पेपरच रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली.