कोरोना लसीकरणातील गैरप्रकार उघडकीस, जिल्हा शल्यचिकित्सकांकडून चौकशीचे आदेश
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : जिल्ह्यात खासगी डॉक्टरने कुटुंबीय आणि परिजनांना कोरोनाची लस दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडीकस आला आहे. भंसाली सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलचे डॉ. भंसाली यांनी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांची नावं लसीकरणाच्या यादीत दिली. त्यानंतर या 19 जणांना लसही देण्यात आली. मात्र हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
गेल्या अनेक महिन्यापासून प्रतीक्षेत असलेली कोरोना लस ही मागील महिन्यात आल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरणाला सुरवात देखील झाली. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केवळ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांना प्राधान्याने मोफत लस देण्याचे निर्देश देण्यात आले होते.
असं असताना सुद्धा अमरावतीच्या अचलपूर येथील डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनाही या लसीकरण याचा लाभ मिळवून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात आता जिल्हा चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
दरम्यान सरकारच्या मार्गदर्शक सूचना नंतर केवळ सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील आरोग्यसेवा कर्मचारी यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात आली आहे. मात्र खासगी रुग्णालयात कुटुंबातील सदस्यांना लसीकरणाचा लाभ मिळवून देण्याची अनेक प्रकरणे अलीकडच्या काळात नोंदवली गेली आहे. असाच धक्कादायक प्रकार हा अमरावतीत उघडकीस आला आहे.