इन्सॅट-३ उपग्रहाने टिपलेल्या महाराष्ट्रातील मान्सूनच्या छायाचित्रांमध्ये दिसतेय `ही` गोष्ट
दोन्ही छायाचित्रांची तुलना केली असता कमालीचा फरक दिसून येत आहे.
मुंबई: जून महिना संपत आला तरी पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील नागरिक चिंतेत आहेत. मात्र, लवकरच ही चिंता मिटण्याची शक्यता आहे. इन्सॅट ३ डीने गुरूवारी सकाळी सातच्या सुमारास दिलेल्या छायाचित्रात महाराष्ट्रावर हळूहळू ढग दाटू लागल्याचे दिसत आहे. उपग्रहाने कालच्या आणि आजच्या दिलेल्या छायाचित्रांची तुलना केली असता दोन्ही छायाचित्रात कमालीचा फरक दिसून येत आहे. कालच्या छायाचित्रात महाराष्ट्रावर एकही ढग दिसत नव्हता. आज मात्र उत्तर महाराष्ट्रावर काही प्रमाण ढग दिसत आहेत. या छायाचित्राचं वर्णन ढगांची दाटी असं करता येणार नाही, पण कालच्यापेक्षा आजचे चित्र नक्कीच दिलासादायक आहे.
तर दुसरीकडे कोकण किनारपट्टीकडेही ढगांची वाटचाल सुरू झाल्याचे आजच्या छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे. पण वाऱ्यांची दिशा आणि कमी दाबाचे पट्टे यावरच मान्सूनच्या पुढची वाटचाल ठरणार आहे.
रत्नागिरीत मान्सून सक्रिय
रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून किनाऱ्याजवळील गावांना प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मान्सूनने विलंब केल्याने जिल्ह्यातील खरीपाचे वेळापत्रकही कोलमडण्याची शक्यता होती. मात्र, आता मान्सून सक्रिय झाल्याने शेतकरीही समाधानी झालेत.
रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात पहाटेच्या सुमाराला पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर पावसाअभावी करपू लागलेल्या भातरोपांनाही जीवदान मिळाले आहे. रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात अलिबागसह पेण, नागोठणे, कोलाड, पाली परिसरात पहाटेच्या सुमारास पाऊस झाला. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून कोकणात सक्रिय होतो. मात्र, यावर्षी मान्सूनने टप्प्याटप्प्याने कोकण व्यापण्याचा प्रयत्न केला.