विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याच्या वजनापूरमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. ही दहशत कुणा गुंडाची नाही तर ही दहशत आहे, गावात आलेल्या अज्ञात अळ्यांची...गावातल्या लोकांनी कधीही न पाहिलेल्या अळ्यांनी सध्या गावाला वेढा घालता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावात दिसणा-या अळ्या घरात तर घुसणार नाही ना, शेत तर खराब करणार नाही ना, माणसाच्या अंगावर तर येणार नाही ना, असे अनेक प्रश्न गावकऱ्यांना पडले आहेत. कारण गेल्या दोन दिवसात गावात या विचित्र दिसणा-या अळ्या दिसू लागल्या आहेत. अळ्यांची झुंड एका रांगेत चालतांना दिसते. ५ फुटांपासून ते १०० फुटांपर्यंत अळ्यांची ही रांग आहे. दुरून सापासारखी दिसणारी ही रांग जवळ गेल्यानंतरच अळ्या असल्याचं समजतं. एकावर एक अशा लाखो अळ्या  पंथसंचालनासारख्या चालतात. 


धक्कादायक म्हणजे सध्या घराच्या बाहेर या अळ्या दिसताय, मात्र त्या घरात येत असल्याचं गावकऱ्यांनी सांगतलं आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अनेकांनी गेल्या दोन दिवसांपासून रॉकेल टाकून, कुणी पेट्रोल टाकून या अळ्यांन संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र या वाढतच चालल्याचं चित्र आहे. आयुष्यात अशा अळ्या पाहिल्याच नसल्याचं गावकरी सांगत असून रात्री झोपतांनाही भीती वाटत असल्याचं त्यांनी म्हटलंय.


या अळ्या जमिनीतून निघून एकत्र पुढे चालतात. या अळ्या नुसत्या चालतच नसून वेगवेगळे आकार ही दाखवत आहेत. सरळ चालतांना सापासारख्या दिसणाऱ्या अळ्या, क्षणात ऑक्टोपससारखा आकार धारण करतात. अळीची भीती परिसरात चांगलीच पसरल्यानं किटक अभ्यासकांनीही गावाला भेट दिली. त्यांनी अळ्यांची पाहणी केली. फंगसवर्म प्रकारातील या अळ्या असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काही दिवसात त्या आपोआप कमी होतील असंही त्यांन सांगितलंय.


अगदी पाणी टाकलं तरी अळ्या वाहून जातील असं अभ्यासकांनी सागितलं. मात्र मोठ्या संख्येने अळ्यांच लयबद्ध चालणं नागरिकांच्या मनात धडकी भरत आहे. धोका जरी नसला तरी पहिल्यांदाच पाहिल्याने भीती आणि कुतूहल नागरिकांमध्ये आहे. वेगळ्याच दिसणा-या या अळ्या त्यामुळे पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरत आहेत.