मुंबई : राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज या तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आधीच नागरिकांना इशारा दिला आहे. नुकतीच सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन यांची आढावा बैठक ही मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.


सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या भागात नवीन रुग्ण आढळून येत आहेत त्यांच्या 20 पट अधिक चाचण्यांची संख्या वाढविण्याचे तसेच लक्षणे असलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी सिटीस्कॅन चाचणी केली जाते तेथे कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.


सार्वजनिक स्वच्छता गृह, बस आणि रेल्वे स्थानके अशा ठिकाणी निर्जंतूकीकरण स्थानिक प्रशासनाने करावे. सार्वजनिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये मर्यादित स्वरुपाची उपस्थिती आणि मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राहील याकडे प्रशासनाने लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.