पुणे : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे एसटी आगाराने सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील बस स्थानकांवर शुकशुकाट पहायला मिळतोय. पोलीसांच्या सुचनेनुसार प्रवाशांची सुरक्षा आणि एसटीचं होणारं नुकसान टाळण्यासाठी तसचं  एसटीने सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शिरुर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड, भोर या तालुक्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात आज बंदच्या निमित्तानं सात हजार पोलीस तैनात करण्य़ात आले आहेत. पुण्यातल्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर तिकडे औरंगाबादमध्येही जनजीवन पूर्णपणे ठप्प आहे. आगारातून एकही एसटी सुटलेली नाही. शाळा, महाविद्यालयं आधीच बंद ठेवण्यात आले आहेत.



मराठा आरक्षणासाठी आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमधून काही शहरांनी माघार घेतली आहे. मुंबई, नवी मुंबईतील मराठा समन्वय समितीने बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही शहरात केवळ काळ्या फिती लावून आंदोलन केलं जाणार आहे. मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे. मात्र एसटी महामंडळाने मुंबईतले तीनही एसटी डेपो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.