Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पुढचे पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जमावबंदीत पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आलीय. तसंच ग्रामीण भागात इंटरनेटही बंद करण्यात आल आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जमावबंदीच्या काळात कोणालाही आंदोलन, निदर्शने किंवा मोर्चा काढता येणार नाही. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात अनेक ठिकाणी जाळपोळ तसंच तोडफोड करण्यात आली. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने जमावबंदी लागू केली.


संपूर्ण जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद 


मंगळवारी संपूर्ण जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद झाली. संध्याकाळी नेमकी मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद सुरू असतानाच नेट बंद पडलं. त्यामुळं उपोषणाला बसलेले जरांगे चांगलेच संतापले. इंटरनेट सेवा तातडीनं सुरू करा, नाहीतर टॉवर घरी घेऊन जा, असा इशारा त्यांनी सरकारला दिला होता.


बीडमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू


बीडमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बीडमधील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्यानं संचारबंदी लागू करण्याचा निर्णय बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी घेतला आहे. त्यानुसार बीड शहर तसेच प्रत्येक तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत आणि जिल्ह्यातील प्रमुख नॅशनल हायवे वर अनिश्चित काळासाठी संचारबंदी आदेश लागू असतील. 


हिंसक आंदोलनात अंदाजे 12 कोटींचं आर्थिक नुकसान 


मराठा आरक्षणासाठी राज्यभरात झालेल्या आंदोलनाप्रकरणी आतापर्यंत 141 गुन्हे दाखल करण्यात आले असून 168 आरोपींना अटक करण्यात आलीय. यापैकी 54 गुन्हे एकट्या संभाजीनगर परिक्षेत्रात दाखल आहेत. या हिंसक आंदोलनात अंदाजे 12 कोटींचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली.


100 टक्के  मराठ्यांना आरक्षण मिळणार


'लबाड राजकारण्यांमुळं मराठा आरक्षण लांबलं, अशी टीका शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली. 'शिंदे-फडणवीस लबाड बोलणारी माणसं नाहीत. त्यामुळं मराठ्यांना आरक्षण 100 टक्के मिळणार, असा दावाही भिडेंनी केला. आंदोलन चिघळता कामा नये, याची काळजी जरांगे पाटलांनी घ्यावी. उद्या सूर्योदय होणार आहे, हे लक्षात घ्यावं, असा सल्लाही त्यांनी जरांगेंना दिला.