कौटुंबिक भांडणात जातपंचायतीचा हस्तक्षेप, भांडण मिटवण्यासाठी 2 लाखांची लाच
![कौटुंबिक भांडणात जातपंचायतीचा हस्तक्षेप, भांडण मिटवण्यासाठी 2 लाखांची लाच कौटुंबिक भांडणात जातपंचायतीचा हस्तक्षेप, भांडण मिटवण्यासाठी 2 लाखांची लाच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2021/08/04/442598-solapur-midc.png?itok=QcXSuslY)
गरीबांसाठी अन्यायकारक ठरत असलेली जातपंचायत बरखास्त करावी अशी मागणी तक्रारदार व्यक्तीने केली आहे
सोलापूर : पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही जातपंचायतीचा जाच सुरूच आहे. सोलापूरात जातपंचायतीचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती-पत्नीच्या भांडणात हस्तक्षेप करत जातीतून बहिष्कृत करण्यात आल्याची घटना हिंदू गोंधळी समाजात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे.
तक्रारदार व्यक्तीचा 19 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये पती आणि पत्नीत काही कारणामुळे वाद झाला. यानंतर पत्नी माहेरी गेली आणि तीने याविषयी जात पंचायतीकडे तक्रार केली. याप्रकरणी जात पंचायतीने भांडण मिटवण्यासाठी पतीकडे 2 लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे देणं शक्य नसल्याने जात पंचायतीने आपल्याला वाळीत टाकल्याचा आरोप तक्रारदार पतीने केला आहे.
काही दिवसांपूर्वी तक्रारदाराच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण जात पंचायतीच्या भीतीने भावाने आजारी आईलासुद्धा भेटू दिलं नाही. यामुळे अखेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम अन्वये चार जणांना अटक केली आहे.
गरीबांसाठी अन्यायकारक ठरत असलेली जातपंचायत बरखास्त करावी अशी मागणी तक्रारदार व्यक्तीने केली आहे.