जाऊ चला शिर्डीला! साई दर्शनासाठी IRCTC चा धमाकेदार प्लान; `अशी` करा बुकींग
IRCTC Tour Packages: आयआरसीटीसीच्या माध्यमातून या मोसमात तुम्ही शिर्डीचा प्लॅन करू शकता.
IRCTC Tour Packages: पावसाळा आला की सर्वजण कुठे ना कुठे फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. काहीजण धबधबे एक्स्प्लोअर करतात, काही ट्रेकींगला जातात तर काहीजण गडकिल्ल्यावर जातात. पावसात मुंबई आणि आसपासची ठिकाणे अधिक सुंदर दिसू लागतात. मुंबईजवळ लोणावळा, खंडाळासारखी ठिकाणे पाहण्यासाठी आहेत. त्यामुळे पावसाळ्यात येथे जाण्याचा मोह कोणाला आवरत नाही. पण तुम्ही साईभक्त असाल आणि कुटुंब, मित्रपरिवारासह शिर्डी साईमंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. आयआरसीटीसीच्या माध्यमातून या मोसमात तुम्ही शिर्डीचा प्लॅन करू शकता.
IRCTC प्रत्येकवेळी महाराष्ट्रासहीत देशभरातील टूर पॅकेजची घोषणा करत असते. नुकतेच त्यांनी शिर्डीसाठी एक नवे टूर पॅकेज लाँच केले आहे. या 4 दिवसांच्या या टूर पॅकेजमध्ये तुम्ही शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर अशी ठिकाणे एक्स्प्लोअर करु शकता. पॅकेजशी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.
आयआरसीटीसीच्या या पॅकेजचे नाव साई शिवम असे असून तुम्ही 3 रात्री आणि 4 दिवस या पॅकेजअंतर्गत प्रवास करु शकता. रेल्वेच्या माध्यमातून तुम्हाला हा प्रवास करायचा आहे. ही ट्रेन शिर्डी येथे थांबेल.
प्रवाशांना काय सुविधा?
आयआरसीटीसीच्या शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर पॅकेजमधून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार आहे. कारण या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला स्लीपर आणि 3AC क्लास ट्रेनची तिकिटे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. तसेच या टूर पॅकेजमध्ये नाश्त्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सहभागी प्रवाशांना विमा सुविधा देखील उपलब्ध असेल, याची नोंद घ्या.
प्रवासासाठी शुल्क किती?
साई शिवम पॅकेजमध्ये जायचा विचार करत असाल तर तुम्हाला या ट्रिपबद्दल सविस्तर माहिती हवी. कोणत्या ठिकाणी जायचं आणि कसे जायचे याबद्दल आपण माहिती घेतली आता. आता किती खर्च येईल? याबद्दल जाणून घेऊया. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थर्ड एसीचे तिकिट मिळेल. यासाठी तुम्हाला 9 हजार 320 रुपये मोजावे लागतील. 2 लोकांसाठी प्रति व्यक्ती 7,960 रुपये शुल्क भरावे लागेल. 3 व्यक्तींसाठी प्रति व्यक्ती 7,940 रुपये शुल्क भरावे लागेल.
मुलांना सोबत नेणार असाल तर त्यासाठी वेगळी फी भरावी लागेल. 5 ते 11 वर्षाच्या मुलांसाठी तुम्हाला 7,835 रुपये मोजावे लागतील. त्यात बेड नको असेल तर तुम्हाला थोडा कमी खर्च येईल.साठी 6 हजार 845 रुपये द्यावे लागतील.
IRCTC ची ट्विट करून माहिती
IRCTC ने साई शिवम पॅकेज टूर पॅकेजची माहिती आपल्या ट्विटरद्वारे शेअर केली आहे. यामध्ये एक इमेज शेअर करण्यात आली असून त्यात सविस्तर तपशील तुम्हाला पाहता येईल. शिर्डीला जायचे असेल तर IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता असे यात म्हटले आहे.
बुकींग कशी करायची?
एवढी सगळी माहिती घेतल्यावर तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून शिर्डीला जायची इच्छा असेल तर पुढील माहिती नक्की वाचा. या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुकींग करावी लागेल. याशिवाय आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि क्षेत्रीय कार्यालयांमधूनही तुम्हाला बुकिंग करता येईल.IRCTC अधिकृत वेबसाइटवर पॅकेजशी संबंधित अधिक माहिती देण्यात आली आहे.