Irshawadi Landslide Beautiful Drone Video: रायगडमधील इरसालवाडीवरील अनेक घरांवर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये 10 गावकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेकजग मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री गिरीष महाजन यासारख्या नेत्यांनी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला आहे. ज्या इरसालवाडीवर दरड कोसळली त्या इरसालवाडीचा 12 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे. इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावाचा ड्रोन व्हिडीओ समोर आला आहे. 


12 दिवसांमध्ये होत्याचं नव्हतं झालं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडकिल्ल्यांवर भ्रमंती करुन ड्रोनने ते निसर्ग कॅमेरात टीपणाऱ्या व्हिडिओ ब्लॉगर जीवन कदम यांनी इरसालगडाचा व्हिडिओ 'झी २४ तास'ला उपलब्ध करुन दिला आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेली इरसालवाडी किती नयनरम्य होती, याची कल्पना देणारा हा ड्रोन व्हिडीओ आहे. व्हिडिओ 8 जुलैचा आहे. मातीखाली गाडलेल्या इरसालवाडीचाच हा व्हिडीओ आहे, असं कोणी सांगितलं तर त्यावर विश्वास बसणार नाही इतका फरक आजच्या आणि त्या दिवशीच्या स्थितीमध्ये दिसत आहे. अवघ्या 12 दिवसांमध्ये या गावातील परिस्थिती होत्याचं नव्हतं झालं म्हणण्यासारखी झाली आहे.



मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात - देवेंद्र फडणवीस


"रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळच्या इरशालगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात सुरुवातीला अडचणी आल्या, मात्र मदतकार्य गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत," असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


पावसामुळे बचावकार्यात अडथळा - अजित पवार


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भीषण दुर्घटनेनंतर प्रतिक्रीया नोंदवली आहे. "रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरजवळ इरशालवाडी परिसरात गावावर दरड कोसळून झालेली दुर्घटना मन पिळवटून टाकणारी आहे. दरडीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. मात्र पाऊस सतत पडत असल्यानं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल अशी प्रार्थना करतो. या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली," असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.