रत्नागिरी : कोकण रेल्वे गाड्यांत मिळणारे बाटलीबंद पाणी सुरक्षित आहे का, असं प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. एक युवक चक्क रेल्वेच्या बेसीनमधील पाणी भरून सील लावून विकत असल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. रेल्वेतील एका प्रवाशाच्या ही बाब लक्षात आली. त्याने तात्काळ टीसीकडे तक्रार केली. त्यानंतर टीसीने या तरुणांला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. तो गेल्या काही महिन्यांपासून बोगस बाटलीबंद पाण्याची विक्री करत असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. हा सगळा प्रकार जामनगर एक्स्प्रेसमध्ये उघड झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जामनगर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने गाडीतील बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्याकडे पाण्याची बाटली मागितली. त्यावेळी त्याने पाण्याची बाटली आणून दिली. परंतु त्याने दिलेले पाणी वेगळे दिसले. हे पाणी सीलबंद बाटलीतील नसून रेल्वेतील साधे पाणी भरले असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. रत्नागिरी स्थानक आल्यावर प्रवाशाने यासंबंधीची तक्रार रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर ही गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात अर्धा तास थांबवून ठेवण्यात आली होती. संबंधित  तरुणाच्याच्या विरोधात टीसीने तक्रार दाखल केली. त्यानंतर रितसर रेल्वेपोलिसांनी कारवाई केली. या तरुणाचं नाव रवींद्र व्यास आहे.


दरम्यान, रेल्वेतील बेसीनमधील पाणी बाटलीत भरून सील लावून विकणाऱ्या कर्मचाऱ्याला आता रत्नागिरीच्या न्यायालयाने चांगलाच धडा शिकवला आहे. या कर्मचाऱ्याला दहा दिवसांची साधी कैद आणि १५०० रुपये दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे २४ तासांच्या आत न्यायालयाने या आरोपीला शिक्षा सुनावली आहे. या घटनेमुळे रेल्वेत मिळाणाऱ्या बाटलीबंद पाण्याचा प्रश्न गंभीर असून कोर्टाने सुनावलेल्या या शिक्षेमुळे अशा पद्धतीने पाणी विकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर चांगलाच लगाम लागेल.